उत्तर प्रदेशात कौटुंबिक `यादवी`, अखिलेश-शिवपालमध्ये लढाई
उत्तर प्रदेशात 2017मध्ये होणाऱ्या निवडणूकीला अवघे काही महिने उरलेले असताना, सत्ताधारी समाजवादी पार्टीतला कौटुंबिक कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.
अलाहाबाद : उत्तर प्रदेशात 2017मध्ये होणाऱ्या निवडणूकीला अवघे काही महिने उरलेले असताना, सत्ताधारी समाजवादी पार्टीतला कौटुंबिक कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादवांकडून प्रदेशाध्यक्षाचा भार काढून त्याचे भाऊ शिवपाल यादवांकडे दिला. त्याला उत्तर देण्यासाठी अखिलेशनं शिवपाल यादवांची सगळी खाती काढून घेतली आहेत. आणि आता निवडणूकीच्या तोंडावर कौटुंबिक कलह उफाळून आला आहे.
खरंतरं शिवपाल आणि अखिलेश यादव यांचं नातं काका पुतण्याचं, पण राजकारणातलं त्याचं सख्य विळ्या-भोपळ्याचं आहे. मुलायम सिंहांनी पुत्राला मुख्यमंत्रीपद दिल्यापासून शिवपाल यादव नाराज आहेत. महत्वाच्या खात्यांसाठी ते आग्रही आहेत. पण गेली चार वर्ष सातत्यानं कान भरण्याचा प्रयत्न केल्यावर गेल्या आठवड्यात शिवपाल यादवांच्या प्रयत्नांना काहीसं यश आलं. अखिलेशचं प्रदेशाध्यक्षपद गेलं आणि आता शिवपाल यादवांनी मुलायम सिंहांकडे पुन्हा एकदा धाव घेतली.
देशपातळीवर एक मुस्सदी नेता म्हणून ख्याती मुलायम सिंह यादव प्रसिद्ध आहेत. पण सध्या आपल्या घरातल्या वर्चस्वाच्या लढाईतून मार्ग काढणं सध्या डोकदुखीचं झालं आहे. एकीकडे मुलगा आणि दुसरीकडे भाऊ. निवडणूकीच्या तोंडावर दोघांचीही मनं सांभाळण्याची तारेवरची कसरत मुलायम सिंहांना करावी लागतेय. हा तिढा सुटला नाही, समाजवादी पक्षाला मोठा फटका बसणार आहे.