कोचीन : काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आणण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर केलाय. तेव्हापासून लोक बँकांच्या बाहेर 1000 आणि 500 च्या नोटा बदलून घेण्यासाठी दिवसभर रांगा लावून उभे आहेत. तर काही ठिकाणी श्रीमंत लोक आपल्या काळ्यापैशाला पांढरे करण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्याप्रमाणात दान करत आहेत. तर याच्या विरूध्द घटना कोचीन येथील एका चर्चमध्ये होतेय. या चर्चमधील दानपेटी गरजूंसाठी खुली करण्यात आली आहे. दानपेटीत जमा झालेला पैसा गरजू लोक आपल्या आवश्यकतेनुसार घेउन जाऊ शकतात तसेच पाहिजे तेव्हा परत करू शकतात.
 
चर्चचे धर्मगुरूंनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या निर्णयामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय परंतु तो त्रास थोड्याफार प्रमाणात कमी करण्याचे काम चर्च करतेय. त्याचबरोबर ते म्हणाले की, हा पैसा फक्त ख्रिश्चन समुदायातील लोकच घेऊन जाऊ शकतात, असे नाही तर हा पैसा प्रत्येक गरजू व्यक्ती आपल्या आवश्यकतेनुसार घेऊन जाऊ शकतात.
 
30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बदलण्याची सुविधा देण्यात आलीये. त्यामुळे अनेक श्रीमंत लोक हा पैसा मंदिरांमध्ये दान करून पुण्य कमवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे या चर्चच्या माध्यमातून हा पैस गरजू व्यक्तींना दिला जातोय. चर्चचे हे कार्य खरोखरच गरजूंसाठी लाभदायी ठरू शकते.