नोटाबंदीचा महिना पूर्ण
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला आज बरोबर एक महिना पूर्ण होतोय.
मुंबई : पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला आज बरोबर एक महिना पूर्ण होतोय.
देशभरात दडलेला काळा पैसा बाहेर यावा या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ नोव्हेंबरला मध्यरात्रीपासून पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. तेव्हापासून आजपर्यंत या जुन्या नोटांच्या स्वरुपात तब्बल ११ लाख ५५ हजार कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय.
त्याचप्रमाणे दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटाही मोठ्य़ा प्रमाणात चलनात आल्या आहेत. पण, रोख रक्कमेसाठी लोकांनाही अजूनही बँकामध्ये रांगा लावाव्या लागत आहेत.
देशातली १ लाख ८० हजारांहून अधिक एटीएम नव्या नोटांसाठी सज्ज करण्यात आली आहेत. त्यामुळे बहुतांश एटीएममधून आता पाचशेच्या नोटाही बाहेर येताना दिसत आहेत. पण, अजूनही सुटे पैसे मिळत नसल्यानं जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारेल असं सरकार आणि रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. पण तूर्तास तरी आणखी काही दिवस रोखीची चणचण भासत राहणार हे निश्चित आहे.