नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात बँक आणि एटीएमबाहेर असलेल्या रांगा चिंतेचा विषय असून परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील अशी भीती सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात चार याचिका दाखल करण्यात आल्यात. या याचिकांवर स्थगिती आणावी अशी केंद्र सरकारने केलेली मागणीही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. 


परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी दिलासादायक बदल करा असं सांगितलं होतं, मात्र नोटा बदलून घेण्याची मर्यादा घटवण्यात आली. त्यामुळे छपाईची समस्या आहे का असा सवाल सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांनी ऍटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना विचारला. 


एटीएम, बँक आणि पोस्ट ऑफिसपर्यंत रक्कम पोहचवण्यात अडचणी असल्याचं यावेळी रोहतगी यांनी सांगितलं. तसंच प्रत्येकाला हजाराची नोट देणं शक्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अचानक पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्यामुळे देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचंही कोर्टानं म्हटलंय.