नवी दिल्ली : भारतानं पाकिस्तानला दिलेल्या विशेष मित्र राष्ट्राचा दर्जाचा पुनर्विचार करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशच्या नियमांअंतर्गत भारतानं 1996मध्ये पाकिस्तान मोस्ट फेव्हर्ड नेशन म्हणजेच MFN दर्जा दिला. 2012पर्यंत पाकिस्तानही भारताला हाच दर्जा देणं अपेक्षित होतं. पण पाकनं तसं केलेलं नाही. तरीही गेली चार वर्ष भारतानं त्याकडे दुर्लक्ष करून आपण दिलेला दर्जा कायम ठेवलाय. पण उरीतल्या हल्ल्यानंतर मात्र पाकला कोंडीत पकडण्याची मोहीम मोदी सरकारनं आखली आहे. 


या मोहीमेअंतर्गत इस्लामाबादला होणाऱ्या सार्क परिषदेवर भारतानं बहिष्कार घातला आहे. सिंधू नदीच्या पाण्याविषयीच्या सिंधू जलवाटप कराराची बांधनं पाळून पाकच्या मुसक्या कशा आवळता येतील यावर या आठवड्याच्या सुरूवातीला अधिका-यांची बैठक झाली.


आता MFN दर्जाचा पुनर्विचार करून पाकची व्यापारी कोंडी करण्याचा मोदीं सरकारचा इरादा आहे. आजच्या बैठकीत परराष्ट्र खात्याचे अधिकारी, वाणिज्य मंत्रालयाचे अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहतील.