राष्ट्रपती कार्यालयाचा काँग्रेसच्या होर्डिंगवर प्रणव मुखर्जींच्या फोटोवर आक्षेप
राष्ट्रपती भवनाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. राष्ट्रपती भवनाने पंजाबमध्ये काँग्रेसच्या होर्डिंग्सवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा फोटो लावल्याविषयी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती कार्यालयाच्या निष्पक्षतेची खात्री करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
चंदीगड : राष्ट्रपती भवनाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. राष्ट्रपती भवनाने पंजाबमध्ये काँग्रेसच्या होर्डिंग्सवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा फोटो लावल्याविषयी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती कार्यालयाच्या निष्पक्षतेची खात्री करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
राष्ट्रपती कार्यालयाच्या सचिव ओमिता पॉल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त नसिम जैदी यांना हे पत्र पाठवलं आहे. राष्ट्रपतींचा फोटो काही जाहिरातींमध्ये आणि होर्डिंग्सवर आढळून आल्याचं या पत्रात म्हटलं आहे. लुधियानाचे निवडणूक उपायुक्त या प्रकरणाचा तपास करत आहेत. कारण हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येते.
राजकारणापेक्षा राष्ट्रपतींचं पद हे पक्षीय वेगळं आहे. राष्ट्रपतींचा फोटो किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वस्तूचा वापर राजकीय हेतूसाठी केला जाऊ शकत नाही, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती कार्यालयाची निष्पक्षता अबाधित राहण्यासाठी निवडणूक आयोगाने संबंधित प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करावी, कोणताच पक्ष राष्ट्रपतींच्या फोटोचा प्रचारासाठी वापर करु शकत नाही, असंही ओमिता पॉल यांनी म्हटलं आहे.