नोटा छापण्यासाटी निवृत्त कर्मचारी पुन्हा कामावर
नोटाबंदीमुळे सध्या देशभरात नोटांचा तुटवडा जाणवतोय. मध्य प्रदेशमधील देवासस्थित सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या युनिट बीएनपीमध्ये सध्या दिवसाचे 24 तास नोटा छपाईचे काम सुरु आहे.
नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे सध्या देशभरात नोटांचा तुटवडा जाणवतोय. मध्य प्रदेशमधील देवासस्थित सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या युनिट बीएनपीमध्ये सध्या दिवसाचे 24 तास नोटा छपाईचे काम सुरु आहे. देवासमध्ये सध्या सर्वाधिक 2000च्या नोटा छापल्या जात आहेत.
सध्या तिथे अशी परिस्थिती आहे की निवृत्त कर्मचाऱ्यांनाही कामावर बोलवण्यात आलंय. त्यांना साधारण 15 हजार रुपये वेतन दिले जात आहे. प्रेसमधील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीप्रमाणे, सध्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर कामाचा दबाव आहे. याआधी इतका दबाव कधी नव्हता. त्यात लहानशी चूकही मोठी समस्या निर्माण करु शकते याची भितीही आहे.
तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दररोज देवास येथून दोन कंटेनर नोटा पाठवल्या जात असल्याचीही माहिती आहे. तेथील कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळही कमी करण्यात आलीये. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्हही देण्यात येणार आहे.
अशीच काहीशी स्थिती होशंगाबाद येथील नोटांचे कागद बनवणाऱ्या पेपर मिलची आहे. येथेही 24 तास नोटांचे कागद बनवण्याचे काम सुरु आहे.