बरेलीत गोणीत नोटा जाळल्या तर गंगा नदीच्या पात्रात लाखोंच्या 500,1000च्या नोटा
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये गंगा नदीच्या पात्रात लाखो रुपये तरंगताना आढळलेत.. सकाळी नागरिक गंगा नदीवर स्नान करण्यासाठी पोहोचले त्यावेळी हे पैसे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये गंगा नदीच्या पात्रात लाखो रुपये तरंगताना आढळलेत.. सकाळी नागरिक गंगा नदीवर स्नान करण्यासाठी पोहोचले त्यावेळी हे पैसे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
तर दुसरीकडे बरेलीमध्ये 500, 1000 रुपयांच्या नोटा जाळण्यात आल्याची घटना पुढे आलेय. एका कंपनीतील कर्मचाऱ्यांनी गोणी भरुन नोटा आणल्या आणि त्यानंतर त्या जाळल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, या नोटा प्रथम फाडण्यात आल्या, त्यानंतर त्या नष्ट करण्यासाठी गोणीला आग लावली.
या लाखो रुपयांमध्ये हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या नोटांचा समावेश होता. बघता बघता ही बातमी सगळी पसरली आणि तिथं बघ्यांची एकच गर्दी उसळली.
काहींनी पैसे घेण्यासाठी नदीत उडी घेतली खरी मात्र त्यांच्या हाती नोटांचे तुकडे तुकडे लागले. नोट बंदीनंतर काळ्या धनापासून वाचण्यासाठी कुणीतरी अशाप्रकारे नोटा गंगेत टाकून पुण्य कमावण्याचा प्रयत्न केला की काय अशा चर्चा सुरु होत्या. मात्र यामुळे एक मात्र म्हणावे लागेल की 'राम तेरी गंगा मैली हो गई'.
दरम्यान, गंगेत चार आणेही न टाकणारे हजारो टाकतायत आणि पुण्य कमावण्याचा प्रयत्न करतायत असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.. 500 आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच मोदींनी भाष्य केलंय.. यानंतर काळा पैसा ठेवणा-यांची खैर नाही असं पुन्हा एकदा मोदींनी ठणकावले.