मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेदासाठी बक्षीस लावणाऱ्याची संघातून हकालपट्टी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शुक्रवारी आपला पदाधिकारी कुंदन चंद्रावत याची हकालपट्टी केलीय. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊ, असं चंद्रावत यांनी उज्जैन इथं जाहीर सभेत म्हटलं होतं.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शुक्रवारी आपला पदाधिकारी कुंदन चंद्रावत याची हकालपट्टी केलीय. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊ, असं चंद्रावत यांनी उज्जैन इथं जाहीर सभेत म्हटलं होतं.
आरएसएसचे मध्यप्रदेशचे राज्यप्रमुख प्रकाश शास्त्री यांनी चंद्रावत यांना संघाच्या सर्व पदांवरून हटवण्याचे आदेश जारी केलेत. संघाबद्दल चुकीची धारणा निर्माण केल्यामुळे चंद्रावत यांना हटवण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
'आरएसएसच्या 300 निर्दोष लोकांची हत्या'
व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत चंद्रावत यांनी कथित रुपात केरळमध्ये आरएसएसच्या कार्यकर्त्यांमागे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा हात आहे आणि त्यांची हत्या करणाऱ्याला आपण एक कोटी रुपये बक्षीस देणार, असं म्हटलं होतं. त्यात त्यांनी आरएसएसशी निगडीत 300 निर्दोष लोकांची हत्या केली गेली मात्र केरळचे मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. यावर देशस्तरातून मोठी टीका झाल्यानंतर आरएसएसनं ही कारवाई केलीय.