निवृत्तीदिनी विद्यार्थ्यांनी बांधली प्राचार्यांची कबर
तिरुवनंतपुरम : तुमच्या शिक्षकांचा कॉलेजमधला शेवटचा दिवस असेल आणि तुम्ही त्यांना काहीतरी आठवणीत राहण्यासारखी भेट देण्याचा विचार करताय, तर काय द्याल?
तिरुवनंतपुरम : तुमच्या शिक्षकांचा कॉलेजमधला शेवटचा दिवस असेल आणि तुम्ही त्यांना काहीतरी आठवणीत राहण्यासारखी भेट देण्याचा विचार करताय, तर काय द्याल? काहीही दिलं तरी शिक्षकांना त्याचा आनंदच होईल. पण, केरळमधील काही विद्यार्थ्यांनी मात्र त्यांच्या शिक्षकांची चक्क कबर बांधली.
डॉ. सरसू या केरळमधील गव्हर्न्मेंट व्हिक्टोरिया कॉलेजमधून प्राचार्य पदावरुन ३१ मार्चला निवृत्त झाल्या. शेवटच्या दिवशी जेव्हा त्या कॉलेजला गेल्या तेव्हा एक कबर खणून त्याला हार आणि फुलं वाहिलेली त्यांना दिसली. 'ही कोणाची कबर आहे?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विचारला. तेव्हा 'तुमची' असं उत्तर त्यांना मिळालं. हे उत्तर ऐकून प्राचार्य अवाक झाल्या.
त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात या विद्यार्थ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. 'माझ्या कारकीर्दीत मी कोणत्याही विद्यार्थ्यांना आंदोलन करुन अभ्यासवर्ग बंद पाडू न दिल्याने विद्यार्थ्यांनी हे केले आहे. यात केवळ विद्यार्थीच नाही तर डाव्या विचारांचे शिक्षकही सामील आहेत,' असं डॉ. सरसू म्हणाल्या. स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या डाव्या विद्यार्थी संघटनेने हा उपद्व्याप केल्याचा आरोप सरसू यांनी केला आहे.