बिहारमधून सिंघम महाराष्ट्रात येणार
शेतकरी कुटुंबातील दबंग, आणि सिंघम म्हणून बिहारमध्ये ओळख असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे लवकरच महाराष्ट्र पोलीस दलायत येतील असं सांगण्यात येत आहे.
पाटणा : शेतकरी कुटुंबातील दबंग, आणि सिंघम म्हणून बिहारमध्ये ओळख असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे लवकरच महाराष्ट्र पोलीस दलायत येतील असं सांगण्यात येत आहे.
शिवदीप लांडे सध्या बिहारमधील पाटणात कार्यरत आहेत, लांडे यांनी महाराष्ट्रात ट्रान्सफरसाठी अर्ज केला आहे.
गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांडे यांच्या अर्जाची दखल घेतल्याचे कळते आहे. तसेच राज्याचे पोलिस महासंचालकांना अर्जाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचे कळते आहे.
शिवदीप हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गावचे रहिवासी आहेत. शिवदीप शेतकरी कुटुंबातील आहेत, त्यांची आई गीताबाई सध्या अकोला जिल्हा परिषदेत सदस्य आहेत.
शिवदीप यांनी मुंबईत प्राध्यापक म्हणून काही दिवस नोकरी केल्यानंतर त्यांनी युपीएससीची तयारी सुरु केली. सुरुवातीला ते केंद्रीय उत्पादन आणि शुल्क विभागात रुजू झाले.
कस्टममध्ये त्यांची पहिली नियुक्ती उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून कोलकाता विमानतळावर झाली. त्यादरम्यान ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची 2005 मध्ये बिहार कॅडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली.
पहिली पोस्टिंग बिहारच्या जमालपूर जिल्ह्यातील मुंगेर येथे झाली. त्यानंतर त्यांना पाटणा शहरात पोलिस अधीक्षकपदी नेमण्यात आले.
त्यांच्या दबंगगिरीने पाटण्यातील गुन्हेगारी जगताला सळो की पळो करून सोडले. त्याची दखल घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लांडे यांना पटण्याचा पोलिस अधीक्षक बनविले. त्यानंतर लांडे यांनी तेथील गुंडगिरी, अवैध व्यवसाय, बेशिस्त वाहतूक, टपोरी युवकांच्या टोळ्या मोडून काढल्या.
त्यांच्याविरुद्ध त्यांनी धडक मोहीम उघडली. त्यांच्या या कामगिरीचे सत्ताधारी पक्षच नव्हे, तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, लोकजनशक्ती पार्टीचे नेते माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही जाहीर सभांमधून कौतुक केलेले आहे.