नवी दिल्ली : ‘‘या देशात महिला शांततेत का जगू शकत नाही,’’ असा उद्विग्न सवाल न्यायालयाने केला आहे. एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीने हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाने सुनावलेल्या सात वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे, त्यावर सुनावणी घेताना न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने आरोपीच्या वकिलांना फटकारत महिलांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.


 ‘‘प्रेमाची एक परिभाषा आहे. कोणावर प्रेम करावे, हे ठरविण्याचा अधिकार महिलेला आहे. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करावे किंवा करू नये, हे तिच्या मर्जीवर आहे. त्यामुळे कोणी तिच्यावर प्रेमासाठी दबाव टाकू शकत नाही,’’ असे खडे बोल आरोपीला सुनावतानाच ‘‘या देशात महिला शांततेने का जगू शकत नाहीत,’’ असा उद्विग्न सवाल न्यायालयाने केला आहे.