जन्मापासून ही खातेय केवळ पारले-जी बिस्कीट
दोन महिन्यांपूर्वीच पारले-जी बिस्कीटांचा सर्वात जुना मुंबईतील कारखाना बंद झाला. गेल्या अनेक वर्षांपासून पारले-जी बिस्कीटाने देशभरातील जनतेच्या मनावर राज्य केले होते.
बंगळूरु : दोन महिन्यांपूर्वीच पारले-जी बिस्कीटांचा सर्वात जुना मुंबईतील कारखाना बंद झाला. गेल्या अनेक वर्षांपासून पारले-जी बिस्कीटाने देशभरातील जनतेच्या मनावर राज्य केले होते.
हेच पारले-जी बिस्कीट कर्नाटकातील एका मुलीचे रोजचे खाद्य बनलेय. रमावा असं या मुलीचे नाव आहे. पारले-जी बिस्किटांशिवाय ही मुलगी दुसरे काही खातच नाही.
लहान असल्यापासून ती पारले-जी बिस्कीट खातेय ती आतापर्यंत. आता ती 18 वर्षांची झालीये. दिवसाला तिला पारलेजीचे सहा ते सात पुडे खाण्यासाठी लागतात.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार पारलेजी खाण्याच्या सवयीबाबत रमावाला विचारले असता ती सांगते, मला दुसरे काही खावेसे वाटत नाही. एका वेळेस चार ते पाच बिस्कीटे मला पुरतात. पारले-जी माझ्यासाठी सर्वकाही आहे. पारले-जी तयार करणे बंद झाल्यानंतर पुढे काय होईल हे मला माहीत नाही.
याबाबत तेथील डॉक्टर गिरीश सोनवलकर यांना विचारले असता, इतर खाद्यपदार्थांविषयी रमावाच्या मनात भिती बसलीये. दुसरे काही खाल्ल्याने आपल्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही ना या भितीने ती पारले-जी शिवाय काही खात नसल्याचे ते म्हणाले.