जोधपूर : जगातील सगळ्यात महागड्या कारच्या किंमतीचा रेकॉर्ड एका घोड्यानं तोडलाय. एक घोडा ज्याची तब्बल एक कोटी ११ लाखात विक्री झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हा मारवाडी जातीचा घोडा आहे, याचं नाव आहे प्रभात. या घोड्यानं चक्क बीएमडब्ल्यू कारलाही मागे टाकलंय. एका कुटुंबानं प्रभातला एक कोटी 11 लाखात खरेदी केलंय. जोधपूर मारवाडी जातीच्या घोड्याची एवढी मोठी डील आजवर कधीही झाली नव्हती. 


नाडोलचे बांधकाम आणि खाण उद्योजक नारायणसिंह आकडावास यांनी भंवरसिंह राठौड यांच्याकडून हा घोडा खरेदी केलाय. आकडावास यांच्याकडे मारवाडी जातीच्या दोन घोडीसुद्धा आहेत. प्रभातसाठी खास दोन अश्वशाळा बनवल्या जातायत. 


एक बंदिस्त तर दुसरी फिरण्यासाठी मोकळी अशाप्रकारच्या दोन जागा त्याच्यासाठी बनवल्या जातायत. ब्रिटीश पॅटर्नवर आधारित त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली असून देखरेखीसाठी तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. 


प्रभातच्या भरपेट खाण्याचीही इथं पुरेपूर काळजी घेण्यात आलीय. खाणं पिणं झाल्यानंतर शॅम्पूनं त्याच्या मानेची मालिश तसंच केस आणि शेपटीच्या केसालाही धुतलं जातं. प्रभातची शान अशी काय आहे की त्याचे फॅन्स देशातच नाही तर परदेशातही आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून देशभरातील अनेकजण प्रभातला खरेदी करण्याच्या तयारीत होते. पंजाबच्या बादल कुटुंबाच्या सदस्यांशिवाय काही उद्योगपतींनी यासाठी तयारी केली होती. 


बालोतरा, पुष्कर आणि अहमदाबादमध्ये झालेल्या अश्व शोचं विजेतेपद प्रभातनं पटकावलंय. रेसिंगमधल्या उपयुक्ततेमुळं अरबी घोड्यांची किंमत जास्त असते मात्र प्रभात या तुलनेत कितीतरी पुढे आहे.