पोलिसाचा उद्दामपणा, आईच्या पोटातच बालकाचा मृत्यू
आपांपसातील भांडणात पोलिसांचा हस्तक्षेप एका कुटुंबाला भलताच महागात पडलाय.
लखनऊ : आपांपसातील भांडणात पोलिसांचा हस्तक्षेप एका कुटुंबाला भलताच महागात पडलाय.
उत्तरप्रदेशातील सुलतानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर येतंय. दोन भावांमधील भांडण सोडवण्यासाठी दाखल झालेल्या पोलिसांनी कुटुंबातील एका महिलेच्या पोटात लाथ मारल्यानं या महिलेला आपल्या बाळाला जन्माआधीच गमवावं लागलंय.
काय घडलं नेमकं...
पार्किन्सनगंज भागात ही घटना घडलीय. दोन भावांमध्ये भांडण सुरू असताना प्रकरण गंभीर रूप धारण करू नये, यासाठी या कुटुंबातील एका मुलीनं १०० नंबर डायल करून पोलिसांना पाचारण केलं.
थोड्याच वेळात सब इन्स्पेक्टर शिव प्रकाश सिंह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घरातील महिलांना शिवीगाळ सुरू केली. याच दरम्यान त्यांचे डोकं भिंतीवर आपटलं आणि त्यांच्या कपाळातून रक्त येणं सुरू झालं.
त्यामुळे, भडकलेल्या सिंह यांनी आपली हद्द ओलांडत कुटुंबातील सदस्यांना मारहाण सुरू केली. यादरम्यान कुटुंबातील एका गर्भवती महिलेच्या पोटावर त्यांची लाथ लागली. त्यामुळे या मुलीच्या पोटात दुखू लागलं... रात्री उशीरा तिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु, एव्हाना तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता.
प्रकरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी या कुटुंबातील सदस्यांना फरफटत पोलीस स्टेशनमध्ये आणलं... धक्कादायक म्हणजे, यात महिलांनाही त्यांनी ताब्यात घेतलं होतं... परंतु, या दरम्यान एकही महिला पोलीस तिथं उपस्थित नव्हती.