नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एका ३२ वर्षीय सुताराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक अनोखी भेट दिली आहे. लाकडावर कोरलेल्या भगवद्गीतेची एक प्रत या व्यक्तीने मोदींना दिली आहे. संदीप सोनी असं या व्यक्तीचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 संदीप सोनी यांनी ही गीता तयार करण्यासाठी तीन वर्ष मेहनत घेतली. गेले अनेक महिने त्यांनी मोदींना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या निमंत्रणानंतर त्याने आणि त्याची आई सरस्वती यांनी काल नरेंद्र मोदींना भेटून ही भेट दिली. या गीतेत भगवद्गीतेतीच्या १८ अध्यायातील सर्व ७०६ श्लोक आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यानंतर या भेटीचा एक फोटो ट्वीट केला. 'संदीप सोनी यांनी मला लाकडात कोरलेल्या भगवद्गीतेची एक प्रत भेट म्हणून दिली. या भेटीसाठी मी त्याचे आभार मानतो,' असं त्यांनी त्या फोटोसोबत लिहिलं आहे. 



'पंतप्रधानांना भेटून मी भावूक झालो आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की माझं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. मी तयार केलेली गीता पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी माझ्या कामाचे कौतुकही केले,' अशा भावना त्याने व्यक्त केल्या. 


सध्या महिन्याला ९,००० रुपये कमावणाऱ्या संदीपने त्याला 'मेक इन इंडिया' अंतर्गत एखादा व्यवसाय सुरू करायचे असल्याचेही पंतप्रधानांना सांगितले. हे ऐकताच मोदींनी उपस्थित अधिकाऱ्यांना संदीप सोनीला मदत करण्यास सांगितले.