वाराणसी : वाराणसी शहराच्या बाबतीत एक नवीन संशोधन पुढे आले आहे. या शहराला तब्बल ६००० वर्षांचा इतिहास असल्याचे आता पुढे येत आहे. म्हणजेच सिंधू संस्कृती असल्यापासून वाराणसीत मानवी वस्ती असल्याचे आता स्पष्ट होत आहे. आयआयटी खडगपूर आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हे संशोधन करण्यात आले आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'त यासंबंधीचे वृत्त आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संशोधकांनी शहरात ठिकठिकाणी १०० मीटर खोल खड्डे खणले आहेत. या खड्ड्यात सापडणाऱ्या वस्तू, अवशेष यांचा अभ्यास करुन या शहरात इसवी सनापूर्वीच्या २००० वर्षांपासून आजतागायत मनुष्यवस्ती असल्याची खात्री या संशोधकांना पटली आहे. या संशोधकांच्या मते ही तारीख इसवी सन पूर्व ४५००वे शतक इतक्या मागे जाऊ शकते. शहरातील गोमती संगम या भागात सर्वात जुने पुरावे सापडले आहेत.


वेगवेगळ्या शतकात या शहरात काय काय बदल झाले याचाही अभ्यास हे संशोधक करत आहेत. ब्रिटिश जिओलॉजिकल सर्व्हे या संस्थेनेही या संशोधनात भाग घेतला होता. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार वेदात आणि काशीपुराणात उल्लेख असलेले नैमिशारण्य या शहरानजीक प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे म्हटले आहे. 


प्राचीन काळात वाराणसीतून वाहणाऱ्या गंगा नदीचा वापर बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचण्यासाठी केला जात असे. आता वर्तमानातही असे काही करणे शक्य आहे का, याची शक्यता पडतीळून पाहिली जात आहे. आयआयटी खडगपूरचे एकूण सात विभाग या कामात गुंतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे.