अंधत्वामुळे आयआयटीने नाकारला प्रवेश, आज ५० कोटींच्या कंपनीचा मालक
मुंबई : श्रीकांत बोला हा तरुण आज ५० कोटीच्या `बोल्लांट इंडस्ट्रीज` नावाच्या कंपनीचा मालक आहे.
मुंबई : श्रीकांत बोला हा तरुण आज ५० कोटीच्या 'बोल्लांट इंडस्ट्रीज' नावाच्या कंपनीचा मालक आहे. सध्या इंटरनेटवर त्याच्या कहाणीची चर्चा आहे. पण, त्याचा हा प्रवास मात्र साधा सरळ नक्कीच नाही.
आंध्र प्रदेशच्या गावात श्रीकांतचा जन्म झाला. जन्मापासूनच तो पूर्णपणे अंध होता. त्याच्या घरची परिस्थिती अगदी बिकट होती. गावकऱ्यांनी तर त्याच्या आई वडिलांना श्रीकांतला कुठेतरी सोडून देण्याचा सल्ला दिला. मात्र कठीण परिस्थितही त्याच्या आई वडिलांनी त्याला वाढवून शिकवण्याचा निर्णय घेतला.
श्रीकांत गावातल्या शाळेत शिकू लागला. पण, आडगावातल्या त्या शाळेत एका शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तीला सामावून घेण्याची स्थिती नव्हती. 'तू काहीच करू शकणार नाहीस,' असं त्याला पदोपदी ऐकावं लागलं. ही गोष्ट लक्षात आल्यावर श्रीकांतच्या वडिलांनी त्याला एका खास शाळेत दाखल केलं. पुढे श्रीकांत दहावीत ९० टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाला.
त्याला कॉलेजात विज्ञान शिकण्याची इच्छा होती. त्यात प्रवेश मिळावा यासाठी त्याला व्यवस्थेशी मोठा संघर्ष करावा लागला. पण, हा संघर्ष इथेच संपणारा नव्हता. बारावीनंतर त्याला प्रतिष्ठीत अशा आयआयटीत शिकण्याची इच्छा होती. पण, तो शारीरिकदृष्टा 'कमकुवत' असल्याने त्याला आयआयटीच्या प्रवेश परिक्षेचे हॉल तिकीटही दिले गेले नाही.
या सर्व प्रकारामुळे श्रीकांत नाराज झाला खरा. पण, जिद्द हरला नाही. 'जे होतं ते चांगल्यासाठीच होतं' हे ब्रीद त्याने लक्षात ठेवलं आणि पुढचे प्रयत्न सुरू ठेवले. त्याच्या प्रयत्नांना यश आलं. अमेरिकेच्या जगविख्यात अशा मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग संस्थेत त्याला प्रवेश मिळाला. एका आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्तीला प्रवेश मिळणारा तो पहिलाच ठरला.
अमेरिकेत त्याच्या स्वप्नांना आकार मिळाला. तिथे शिकताना आपण भारतात परत जायचं आणि देशासाठी काम करायचं असा त्याने पण केला. आपल्या देशात आपल्याप्रमाणेच हजारो व्यक्तींना विविध संधींना मुकावं लागत असणार, याची त्याला कल्पना होती. अशा व्यक्तींसाठी आपण काम करावं अशी श्रीकांतची इच्छा होती. यापूर्वी 'लीड इंडिया' प्रोजक्ट अंतर्गत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांसोबतही त्याला काम करण्याची संधी मिळाली होती.
भारतात परतल्यावर त्याने एक कंपनी सुरू केली. या कंपनीमार्फत त्याने इको फ्रेंडली वस्तूंचे पॅकेजिंग, मार्केटिंग करण्यास सुरुवात केली. पुढे कंपनीचा विस्तार झाला. आज या कंपनीत अनेक प्रकारची शारीरिक व्यंग असणाऱ्या आणि परिस्थितीमुळे शिक्षणास मुकलेल्या अशा १५० व्यक्ती काम करतात. श्रीकांत या कंपनीचा सीईओ म्हणून काम पाहतो. त्याच्या याच कंपनीचा टर्न ओव्हर ५० कोटी रुपये इतका आहे. आज मागे वळून पाहताना श्रीकांत 'मी काहीही करू शकतो,' असं अभिमानाने सांगतो.