नवी दिल्ली : देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारची तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर, दिल्लीतल्या जेएनयूमध्ये त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी कन्हैयानं जेएनयूमधल्या आपल्या सहका-यांसमोर भाषणही केलं. यावेळी बोलताना, भारतापासून नाही तर भारतात स्वातंत्र्य मागत असल्याचं कन्हैयानं म्हंटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोबतच आपल्याविरोधात षडयंत्र रचलं गेल्याचाही त्यानं पुनरुच्चार केला. कन्हैयाला बुधवारी दिल्ली हायकोर्टानं १० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सहा महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. तसंच देशविरोधी कृत्यांपासून दूर राहण्याची ताकीदही दिलीय. नऊ फैब्रुवारीला जेएनयूच्या परिसरात अफजल गुरूच्या समर्थनात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात  देशविरोधात घोषणा दिल्याचा आरोप कन्हैयावर आहे. 



मी एका गावातून आलेला सामान्य विद्यार्थी आहे. तिथे अनेकदा जादूचे खेळ होतात. हे जादूगार लोकांना अंगठ्या विकतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल, असे सांगतात... असेच काही लोक आपल्या देशातही आहेत. ते आम्ही काळा पैसा परत आणू, सबका साथ सबका विकास, अशा बतावण्या मारतात. आपण भारतीय लोक अशा बतावण्या विसरूनही जातो. पण यावेळचा हा तमाशा मोठा आहे आणि तो विसरण्यासारखा नाही, अशा शब्दांत कन्हैयाने मोदी सरकारवर खरमरीत टीका केली. 


आम्हाला भारतापासून स्वातंत्र्य नको. आम्हाला भारतामध्ये स्वातंत्र्याचे वातावरण हवे आहे, असे कन्हैय्या म्हणाला. भूक, भ्रष्टाचार, भेदभाव आणि मागासलेपणापासून ही मुक्ती. अशा घोषणा देतच त्याने भाषणाची सुरुवात केली.


 


'जेएनयू'वरील सरकारची कारवाई नियोजित होती. त्यांना विरोधाला बेकायदा ठरवायचे होते. रोहित वेमुलाला न्याय मिळावा, यासाठी चाललेल्या लढाईतील धार त्यांना कमी करायची होती. ही लढाई यापुढेही सुरू राहील. लोकशाहीचे पुरस्कर्ते असल्यामुळे अभाविप या संघटनेविरोधात कटुतेची भावना नाही, असे तो म्हणाला. 


भाषणातील ठळक बाबी ? 


- पंतप्रधान मोदी 'सत्यमेव जयते' असं ट्विट करतात पण 'सत्यमेव जयते' हे कोणा एका व्यक्तीचे होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेचं ते देणं आहे. त्यामुळे आम्हीही 'सत्यमेव जयते' म्हणणार आहोत. 


- पंतप्रधान 'मन की बात' करतात पण 'मन की बात' ऐकत मात्र नाहीत. पंतप्रधानांनी लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, एका माऊलीच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणारा पंतप्रधान हवा आहे. 



- 'जेएनयू'तून जो आवाज उठला त्याचा विरोध कसा करायचा, याची संपूर्ण योजना नागपुरातून आखण्यात आली. या सगळ्यामागे आरएसएस आहे. 


- 'जेएनयू' विरोधातील हा हल्ला पुर्वनियोजित होता. अशा हल्ल्यांनी आम्ही दबणार नाही. तुम्ही जेवढं आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न कराल तेवढेच भक्कमपणे आम्ही उभे राहू. 


- मी माझी कहाणी स्वत:च लिहिणार आहे. त्याची सुरुवात मी जेलमधून केली आहे. मी कधीही भारताविरोधात बोललेलो नाही. सत्य हे शेवटपर्यंत सत्यच राहतं, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हळहळू सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. मी दीर्घ लढाईसाठी सज्ज आहे. 


- 'अभाविप'बाबत आमच्या मनात कोणताही द्वेष नाही. आम्ही त्यांना शत्रू नाही तर विरोधक मानतो. 


- माझी स्वत:ची एक विचारसरणी आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी माझा संबध नाही. मात्र माझं समर्थन करणाऱ्या राहुल गांधी, सीताराम येचुरी, अरविंद केजरीवाल या नेत्यांवरही देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले. देशात एकप्रकारची भयंकर अशी प्रवृत्ती बळावताना दिसत आहे. त्यापासून आपणाला सगळ्यांनाच सावध व्हावं लागणार आहे. 


- अयोध्येचा मुद्दा पुन्हा रेटला जात आहे पण यावेळी 'मुंह मे राम और बगल मे छुरी' खपवून घेतली जाणार नाही.