तामिळनाडूचा `पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त`
तामिळनाडूच्या सत्ताकारणामध्ये उठलेलं एक वादळ आज शमलं. सत्ताधारी एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला नटराजन यांनी बंगळुरूच्या कोर्टात शरणागती पत्करली.
नवी दिल्ली : तामिळनाडूच्या सत्ताकारणामध्ये उठलेलं एक वादळ आज शमलं. सत्ताधारी एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला नटराजन यांनी बंगळुरूच्या कोर्टात शरणागती पत्करली.
ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं शशिकलांसह अन्य तिघांना दोषी मानलं. आपली कैद लांबवण्यासाठी शशिकलांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. शरण येण्यासाठी त्यांनी मागितलेली मुदत सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यानंतर सकाळी पोझेस गार्डन इथल्या जयललितांच्या निवासस्थानाहून शशिकला बाहेर पडल्या आणि थेट मरिना बिचवरील अम्मांच्या समाधीवर गेल्या... त्या तिथं 10 मिनिटं बसल्या होत्या. उठताना समाधीवर दोन वेळा हात आपटून त्यांनी शपथ घेतली... पक्ष कार्यकर्ते आणि कुवाथूरच्या रिसॉर्टमध्ये असलेल्या आमदारांना संदेश देताना 'केवळ मला कैद होईल... पक्षासाठी मला वाटणारी काळजी कोणीही अडकवू शकत नाही. मी कुठेही असले तरी कायम पक्षाचाच विचार करीन...' असंही शशिकला यांनी म्हटलं.
त्यानंतर बंगळूरमध्ये जाऊन शशिकलांनी न्यायालयात शरणागती पत्करली. यावेळी त्यांच्यासोबत या प्रकरणातले आणखी दोन दोषी व्ही.एन. सुधाकरन आणि एलावरासी हेदेखील शरण आले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जेलच्या आवारातच तात्पुरतं न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं.
आता शशिकला गजाआड गेल्यामुळे तामिळनाडूतला एक अध्याय संपला असला, तरी अद्याप सत्तेचा तिढा सुटलेला नाही. सुप्रीम कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर शशिकलांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवडून काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांना शह दिलाय... पक्षाच्या 124 आमदारांपैकी 120 जणांचा पलानीस्वामींना पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. या आमदारांना बळजबरीनं डांबून ठेवल्याची ओरड करत शशिकला आणि पलानीस्वामी यांच्यावर कांचिपुरम इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र हा पनीरसेल्वम यांचा बनाव असल्याचा आरोप शशिकला गटानं केलाय...
आता सर्वांच्या नजरा राजभवनाकडे लागल्यात. राज्यपाल विद्यासागर राव शपथ घेण्यासाठी कोणाला निमंत्रण देणार, यावर राजकारणाची पुढली दिशा अवलंबून असेल... तामिळनाडूचं राजकारण आणि चित्रपट यांचं नातं घट्ट आहे... कॉलिवूडमधले अनेक दिग्गज नंतर राज्याचे मुख्यमंत्रीही झाले... त्यामुळेच एखाद्या चित्रपटात शोभाव्यात अशाच घटना गेल्या काही दिवसांत घडल्या... पण अद्याप हे नाट्य संपलेलं नाही, पिक्चर अभी बाकी है...