नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प आज जाहीर होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होतायत. या पार्श्वभूमीवर भाजपचं केंद्र सरकार मुंबईसाठी विशेष घोषणा करणार का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची जय्यत तयारी भाजपनं केलीय. शिवसेनेशी युती तुटल्यानंतर, आपली सगळी शक्ती भाजपनं पणाला लावलीय. बुधवारी जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक राजधानी मुंबईसाठी खास घोषणा करण्याची संधी भाजपकडं असणार आहे. गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत एक लाख कोटी रूपयांच्या विकासकामांची भूमीपूजनं केली होती. त्याचाच पुढचा भाग म्हणून मुंबईकरांना खूष करण्याचा प्रयत्न बजेटमधून होऊ शकतो, असा अंदाज आहे.


बजेटमधून मुंबईकरांच्या पदरात काय पडू शकतं, ते पाहूयात...


- रेल्वे प्रचंड तोट्यात असली तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढ केली जाणार नाही


- वांद्रे विरार उन्नत मार्ग तसंच पनवेल सीएसटी उन्नत मार्गासाठी निधीची तरतूद केली जाईल


- विरार वसई पनवेल कॉरीडॉरची घोषणा होण्याची शक्यता आहे.


- विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, १२ डब्यांच्या ४७ लोकल सेवेत येणे, रुळ ओलांडण्यावर उपाययोजना यासाठी एमयूटीपी ३ च्या प्रकल्पांना निधी दिला जाईल.


- महिलांच्या लोकल डब्यात सीसीटीव्ही बसवणे


- रेल्वे स्टेशन, बस स्थानके वायफाय करणे


- स्मार्ट शहरांचा विकास करणे


- डिजीटायझेशन आणि आर्थिक सेवांची उपलब्धता


- डिजीटल पेमेंटसाठी स्मार्ट फोन स्वस्त करणं, अशा घोषणांचा समावेश असू शकतो.


मुंबई महापालिकेत भाजप पहिल्यांदाच स्वबळावर लढतंय... त्यामुळं देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे... नोटाबंदीच्या निर्णयाचा मुंबईतल्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय... त्यामुळं बजेटच्या निमित्तानं मुंबईकरांना खूष करण्याची संधी भाजपला आहे... त्यामुळं जेटलींच्या पेटाऱ्यात मुंबईकरांसाठी काय दडलंय याकडेच सर्वांच लक्ष लागलंय.


भाजपकडं ही संधी असली तरी कामांची केवळ घोषणा करून मुंबईकरांचे प्रश्न सुटणार का? असा सवाल शिवसेनेनं केलाय.


मुंबईत सध्या ब्रेक अप, पॅच अपचे राजकीय वारे वाहतायत. पण सामान्य मुंबईकरांचं लक्ष सध्या लागलंय ते त्यांचे जगण्याचे प्रश्न कोण सोडवणार? याकडे... सुरक्षित प्रवास, महागाईवर नियंत्रण, परवडणारी घरं आणि स्वस्त व्याजदर ही मुंबईकरांची स्वप्न भाजप सरकारच्या बजेटमधून खरंच साकार होतील?