ही होती शहीद हणमंतप्पाच्या पत्नीची त्यांच्यासाठीची शेवटची इच्छा
भारताचे हिमयोद्धे लान्स नायक हणमंतप्पा यांनी सियाचिनमध्ये हिमस्कलनानंतर सहा दिवस मायनस ५० डिग्री मध्ये मृत्यूशी झुंज दिली.
नवी दिल्ली: भारताचे हिमयोद्धे लान्स नायक हणमंतप्पा यांनी सियाचिनमध्ये हिमस्कलनानंतर सहा दिवस मायनस ५० डिग्री मध्ये मृत्यूशी झुंज दिली. पण भारताच्या या वीरपुत्राची मृत्यूबरोबरची लढाई अपयशी ठरली.
हणमंतप्पा यांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबालाही धक्का बसला आहे. सियाचिनमध्ये निसर्गाबरोबर झुंजलेले हणमंतप्पा या मृत्यूच्या लढाईलाही हरवतील अशी त्यांच्या कुटुंबियांची अपेक्षा होती.
हणमंतप्पांसाठी त्यांची पत्नी महादेवी यांनी शेवटची इच्छाही बोलून दाखवली होती. देवा, हणमंतप्पांऐवजी माझं आयुष्य घे, माझ्या नवऱ्याला देशाचं रक्षण करु दे, ते वाचले पाहिजेत, अशी इच्छा हणमंतप्पा यांच्या पत्नीनं व्यक्त केली होती. तर सियाचिनमधल्या प्रतिकूल परिस्थितीतून वाचलेल्या हणमंतप्पांसाठी हा दुसरा जन्म आहे, अशी भावना त्यांच्या आईनं व्यक्त केली होती.