राजपुत्राचा जन्म भूतानसाठी ठरला वरदान!
थिंपू : हिमालयाच्या कुशीत वसलेला आणि फारसा कधी चर्चेत नसणारा देश म्हणजे भूतान...
थिंपू : हिमालयाच्या कुशीत वसलेला आणि फारसा कधी चर्चेत नसणारा देश म्हणजे भूतान... पण, याच इटुकल्या देशाने संपूर्ण जगासाठी आदर्श घालून दिला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या राजपुत्राच्या जन्मानिमित्त या देशाने एकूण १ लाख ८ हजार झाडांचे रोपण केले आहे.
भूतानचे राजा खेसर आणि त्यांच्या राणी जेत्सुन यांना गेल्या महिन्यात मुलगा झाला. देशभरात त्याचा आनंदोत्सव साजरा केला गेला. पण, पर्यावरणाच्या बाबतीत कायम संवेदनशील असलेल्या देशाने हा आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं.
देशातील १४ देशांच्या विविध भागांत एक लाखापेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, यातील ८२,००० झाडे तेथील नागरिकांनी स्वेच्छेने लावली आहेत तर इतर २६,००० झाडे काही स्वयंसेवकांनी लावली आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, भूतान हा जगातील असा एकमेव देश आहे जिथून कार्बनचे उत्सर्जन होत नाही तर येथील निसर्ग प्रदूषण करणारे घटक स्वतः शोषून घेतो.
बौद्ध धर्मात १०८ या अंकाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. हा आकडा शुभ मानला जातो. या झाडांचे रोपण करताना देशातील नागरिकांनी नव्या राजपुत्राचा दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
याच निमित्ताने भूतानच्या पर्यटन विभागातर्फेही ५,००० झाडांच्या रोपट्यांचे रोपण करण्यात आले. तसेच राजधानी थिंपू येथे एका बगीचाचे उद्घाटनही करण्यात आले. इथे येणारे पर्यटक त्यांच्या नावाने झाडे लावू शकतात. म्हणजेत कायम त्यांची नावे या उद्यानात अजरामर होणार आहेत.