न्यूयॉर्क : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका जेमतेम महिन्यावर आल्या असताना रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसला आहे. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी 2005 साली एका मुलाखतीत महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानकारक विधानं केल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रम्प यांची भाषा इतकी अश्लिल आहे, की या दीड मिनिटांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण रिपब्लिकन प्रचार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याचं मानलं जातं आहे. खुद्द पक्षाचे अनेक सिनेटर्स आणि गव्हर्नर यांनी ट्रम्प यांचा पाठिंबा काढून घेतल्याचं जाहीर केलंय.


या सगळ्या वादानंतर ट्रम्प यांनी बिनशर्त माफी मागितली असली तरी निवडणुकीतून माघार घेण्यास ठाम नकार दिला आहे. ट्रम्प यांची तिसरी पत्नी आणि पूर्वीश्रमीची मॉडेल मेलिनिया यांनीही अमेरिकन जनता या माफीचा स्वीकार करेल असं सांगत आपल्या पतीची पाठराखण केली आहे, मात्र पुढल्या महिन्यात होणाऱ्या निवडणुकीचा निकाल आता हिलरी क्लिंटन यांच्या बाजूनं लागल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे.