शांघाई : गौरी गणपती येणार म्हटल्यावर उत्साहाचा, आनंदाचा जो शहारा गावाकडे असताना उमटायचा तसाच अनुभव परदेशात राहतानाही अगदी दरवर्षी तेथील भारतीयांना येतो आहे. परदेशात गेल्यावर तिथल्या संस्कृतीशी एकरूप होताना जसं तिकडच्या प्रथा-परंपरा आचरणात आणल्या जातात तशाच आपल्या देशातल्या त्या जुन्या आणि लळा लावणार्‍या प्रथा, परंपरा पाळल्या जातात. आपल्या देशाशी जोडणारे सण उत्सव साजरे केले जातात. श्रावण सुरू झाला की, जी ओढ आपल्या देशातल्या घराघरांना लागते तशीच इकडे परदेशी राहणार्‍या मराठी घरांनाही लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठीमाती पासून खूप दूर राहत असताना मराठी भाषा, मराठी गाणी, नाटक, पुस्तके यांची वारंवार आठवण येते. वडापाव किंवा थालीपीठाची चव जिभेवर रेंगाळत राहते. गणपती बाप्पा मोरया, पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा गजर कानात घुमू लागतो. लावणी किंवा लेझीमच्या तालावर पावलं थिरकू लागतात. पोवाड्याचे स्वर ऐकताच छाती रुंदावते.


हे सारे जर उचलून आणले तर? मराठी मित्रांना एकमेकांना भेटायला, गप्पा मारायला, सण व सांस्कृतीक  कार्यक्रम साजरे करायला, पुस्तके वाचायला व प्रसंगी मदतही करायला उपलब्ध असणारे मित्र शांघाईमध्ये आहेत.


शांघाय मराठी मंडळ


वर्ष 2002 मध्ये 4-5 मराठी कुटुंबे (अंदाजे 10-12 लोक) एकत्र आले आणि त्यांनी अतिशय अनौपचारिक शैलीमध्ये शांघाय, चीनमध्ये गणेशोत्सव, संक्रांत आणि गुढी पाडवा घरगुती शैलीमध्ये साजरा करायला सुरुवात केली. वर्ष 2007 ह्या गटाची ताकद 50 झाली. तेव्हापासून ह्या गटाचं नाव शांघाय मराठी मंडळ असं झालं.



वर्ष 2010 मध्ये मंडळ सदस्यत्व 170 प्रौढ आणि 45 मुले एव्हढं होतं. आता सुमारे 140 प्रौढ आणि 40 मुलं असं या मंडळाचा विस्तार आहे. या वर्षी आपल्या गणेशोत्सवाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात ह्या मंडळाने लोकांना एकत्र आणणे, उत्सव साजरे करणे, मुलांना मराठी परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणे, त्यांच्या प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देणं, इत्यादी कामे केली आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे आम्ही सगळे घरा पासून दूर राहात असून पण या ठिकाणी घराच्या सारखे वातावरण तयार करून त्याचा आनंद मिळवू शकतो असं येथील लोकाचं म्हणणं आहे.


शांघायमध्ये मराठी समुदाय लहान आहे ही प्रत्यक्षात आमची एक शक्ती म्हणायला हवी. एक मंडळ आणि निःस्वार्थी पणे केलेली समाजाची सेवा ही वृत्ती बाळगून आम्ही गेल्या काही वर्षांपासून दिलीप प्रभावळकर, अशोक पत्की, सुधीर गाडगीळ, शरद पोंक्षे, श्रीधर फडके अश्या ख्यातनाम कलाकारांचे कार्यक्रम शांघायमध्ये आयोजित करण्यात यशस्वी झालो.


मंडळाची उद्दिष्टे :



1. शांघाय आणि लगतच्या शहरातल्या मराठी कुटुंबियांना सर्व सामान्य विषयांवर चर्चा करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे.
2. गणेशोत्सव, गुढी पाडवा, मकरसंक्रांत, कोजागिरी, सहली इत्यादी सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करणे.
3. मदत आणि देणग्या सारख्या उपक्रमांना हातभार लावणे.
4. मिक्सरचं आयोजन करणे जेणेकरून आपल्यापैकी वेगवेगळ्या क्षेत्रांमधील सभासदांचे अनुभव आणि त्यांच्या यशाचा फायदा बाकीच्या सभासदांना होईल. हा कार्यक्रम मराठी पाऊल पडते पुढे ह्या सदरा खाली आयोजित केला जातो.
5. फेसबुक, ईमेल आणि व्हाट्सअँप सारखी साधने वापरून सर्व सभासदांना एकत्रित ठेवून त्यांच्या मध्ये सतत संवाद चालू ठेवणे आणि आपल्या नियोजित कार्यक्रमांची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देणे.


(साभार : राजाराम पाटील / संजय कुलकर्णी, शांघाई मराठी मंडळ)