ढाका : पूजेसाठी जात असताना एका ७० वर्षीय पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बांग्लादेशात घडली आहे. या पुजाऱ्याची गळा चिरून हत्या केली असून अद्याप त्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही. मात्र इस्लामिक स्टेट किंवा अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडले ?


आनंद गोपाल गांगुली असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गांगुली हे पुजारी होते आणि हिंदू घरांमध्ये ते पूजाविधी करायचे. नेहमीप्रमाणे पूजेसाठी घरातून निघाल्यानंतर वाटेतून अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि एका शेतात या पुजाऱ्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता अशी माहिती जिल्ह्याचे उपपोलीस प्रमुख गोपीनाथ कांजीलाल यांनी दिली. मात्र अद्याप हत्या करणाऱ्यांची कोणतीही माहिती मिळालेली नाही.  


बांगलादेशात सक्रीय असलेल्या इस्लामिक स्टेट आणि अल-कायदाच्या स्थानिक दहशतवाद्यांकडून अल्पसंख्याक हिंदू, धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्यांना सातत्याने लक्ष्य केल जात आहे. गेल्या १० आठवड्यांतील ही १०वी घटना आहे. प्रत्येक हत्येनंतर खुणी एक विशिष्ट खूण सोडून जातात आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ही खूण पुजाऱ्याच्या मृतदेहावरही आढळली आहे. त्यामुळे ही हत्या याच दहशतवादी गटांनी केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.