दुबई :  उपरवाला जब भी देता, देता छप्पर फाडके... अशी म्हण एका भारतीय तरूणाच्या बाबतीत खरी ठरली आहे. अबुधाबीत राहणाऱ्या एका भारतीयाला तब्बल १२ कोटींची लॉटरी लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली नऊ वर्षं नोकरीनिमित्त यूएईमध्ये अबुधाबीत राहणाऱ्या श्रीराज कृष्णन कोप्परेम्बिल या तरूणाला दरमहा सहा हजार धिरम (१,०८,००० रुपये) इतका पगार होता. 


श्रीराज कृष्णन कोप्परेम्बिल हा मूळ केरळचा. अबूधाबीमध्ये तो शिपिंग को-ऑर्डिनेटर म्हणून काम करतो. लॉटरी काढून नशीब अजमावणं हा त्याचा छंदच. मोठ्या रकमेची लॉटरीची तिकिटं तो नियमितपणे खरेदी करायचा, पण नशीब काही चमकत नव्हतं. मात्र, ५ मार्चला चमत्कार घडला आणि कृष्णन करोडपती झाला.


आता हे शेवटचं तिकीट, असं म्हणून कृष्णननं ४४६९८ या आपल्या लकी नंबरचं लॉटरी तिकीट खरेदी केलं होतं. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असावं. कारण, ७ दशलक्ष धिरम म्हणजेच १२ कोटी ७२ लाख २१ हजार ६२२ रुपयांची लॉटरीची भव्य सोडत ५ तारखेला निघाली आणि त्यात कृष्णनचा 'लकी नंबर'च जाहीर झाला.


कृष्णनला जेव्हा हे कळाले तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. तो म्हणाला, 'मला एवढी मोठी लॉटरी लागली यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. उलट, यावेळी लॉटरी लागली नाही, तर पुन्हा हा खेळ खेळायचा नाही, असं मी ठरवलं होतं. त्यामुळे हे सगळं स्वप्नच वाटतंय, अशा भावना कृष्णनने व्यक्त केल्या.


आता या रकमेतून, केरळमधील घरासाठी काढलेलं कर्ज फेडायचं त्यानं ठरवलंय. उर्वरित रकमेचंही तो व्यवस्थित नियोजन करणार आहे. तसंच, अबुधाबी आपल्यासाठी लकी असल्यानं यापुढेही तिथेच राहायचं त्यानं पक्कं केलंय.