आजोबांच्या `त्या` फोटोमुळे सारं इंटरनेट संतापलं
वॉशिंग्टन : शुक्रवारी ट्वीटरवर एका फोटोने धुमाकूळ घातला.
वॉशिंग्टन : शुक्रवारी ट्वीटरवर एका फोटोने धुमाकूळ घातला. हा फोटो होता अमेरिकेतील एका आजोबांचा. त्यांच्या नातीने हा फोटो अपलोड केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला.
त्याचं झालं असं की केलसी हॅरीसन या वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या आजोबांनी त्यांच्या सहा नातवंडांना रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं. आपली नातवंडं येणार म्हणून खूश झालेल्या आजोबांनी 12 बर्गर तयार केले. पण, जेवणाची वेळ आली तेव्हा मात्र केलसी एकटीच तिथे हजर होती. बाकीच्या पाच नातवंडांनी काहीतरी कारण देऊन येण्याचं टाळलं.
यामुळे दुःखी झालेल्या आजोबांनी केलसीसोबतच काही बर्गर खाल्ले. दुःखी झालेल्या आजोबांचा फोटो केलसीने ट्विटरवर अपलोड केला. तो इतका व्हायरल झाला की केलसीच्या आजोबांना प्रतिक्रिया आल्या. हे वाचल्यावर त्यांचा आणखी एक नातू रात्री उशीरा त्यांच्या भेटीला गेला आणि त्यांनी बनवलेल्या बर्गरचा आस्वाद घेतला.
केलसीने अपलोड केलेल्या फोटोवर काहींनी दुःख दर्शवलं, तर काहींनी राग व्यक्त केला. काहींनी तर चक्क त्यांच्या अनुपस्थित नातवंडांना जीवे मारण्याची धमकीही दिली. तर काहींनी आजोबांनी तयार केलेले हे बर्गर खाण्यासाठी त्यांच्या घरी येण्याची तयारीही दर्शवली. शेवटी एका दुःखी झालेल्या आजोबांना त्यांच्या नातीच्या एका ट्वीटमुळे जगभरातून लाखो नातवंड मिळाली.