काळ्या पैशांवर 30 डिसेंबरनंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक!
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा बाळगणाऱ्यांना नवा इशारा दिला आहे.
कोब, जपान : पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा बाळगणाऱ्यांना नवा इशारा दिला आहे. 30 डिसेंबरनंतर काळे पैसे असणाऱ्यांवर कारवाई होणार नाही किंवा नवी उपाययोजना येणार नाही, याची कोणतीही खात्री नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एका सर्जिकल स्ट्राईकचे संकेत दिले आहेत.
पैशांचा हिशेब लागला नाही तर स्वातंत्र्यापासूनचे सगळं नोंदी पाहण्यात येतील, कोणालाही सोडलं जाणार नाही, असंही मोदी म्हणाले आहेत. गंगा नदीमध्ये आधी कोणी एक रुपयाही टाकत नव्हतं पण आता पाचशे आणि हजार रुपये टाकत आहेत. हे सर्वात मोठं स्वच्छता अभियान आहे, यामागे कोणाला त्रास द्यायचा उद्देश नाही. देशातल्या गरिबांनी श्रीमंती दाखवली, श्रीमंतांची गरिबी अनेक वेळा बघितलं आहे, असा टोला मोदींनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी काळ्या पैशावर नव्या कारवाईचे संकेत दिले. नोटबंदीच्या निर्णय घेतल्यानंतर सामान्यांनी याचं स्वागत केलं, याचंही मोदींनी कौतुक केलं आहे.
नोटाबंदीचा निर्णय एका दिवसात घेतलेला नाही. यासाठी आधी आम्ही काळा पैसा पांढरा करण्यासाठी योजना आणून संधी दिली, असं मोदींनी नमूद केलं. नोटा बंदीची कोणालाही कल्पना येऊ नये म्हणून या गोष्टी गुपित ठेवण्यात आल्याचंही मोदींनी सांगितलं.