नवी दिल्ली : म्यानमारच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गेल्या 50 वर्षांची लष्करी राजवट झुगारून लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेल्या पहिल्या सरकारचा शपथविधी आज झाला. लोकशाही आंदोलनाच्या प्रणेत्या आँग सॅन स्यू की यांचे खूप जुने सहकारी टिन क्याव यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.


स्यू की यांना घटनेनं अध्यक्ष होण्यापासून रोखलं असलं, तरी या सरकारचा सुकाणू त्यांच्याच हाती असेल, हे स्पष्ट आहे. त्या नव्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असतील. नॅशनल लिग फॉर डेमोक्रेसी या पक्षानं नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत 80 टक्के जागा जिंकल्यात. या शपथविधीनंतर अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मावळते लष्करशाह थेईन सिन यांनी क्याव यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं सोपवली.