लंडन : तुम्ही प्रवास करत असलेल्या विमानाचे कोणी अपहरण केले, ते बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आणि विमानातील सर्व प्रवाशांना बंदी बनवले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? साहजिकच तुमच्या हृदयाची धडधड काही काळासाठी थांबून जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, मंगळवारी झालेल्या इजिप्त एअरच्या विमान अपहरण नाट्यात एका बंदी झालेल्या प्रवाशाने अपहरणकर्त्यासोबत चक्क एक फोटो घेतल्याच्या बातम्या इंटरनेटवर दंगा करत आहेत. 


मंगळवारी इजिप्त एअरच्या अलेक्झांड्रिआहून राजधानी कैरोला जाणाऱ्या  MS181 या विमानाचे अपहरण झाल्यावर हे विमान सायप्रस देशात नेण्यात आले. पण, या विमानात प्रवास करणाऱ्या बेन इन्स या प्रवाशाने अपहरणकर्त्यासोबत चक्क स्वतःचा एक फोटो काढला आणि तो ट्विटरवर अपलोड केला.



बेन हा ब्रिटनचा नागरिक आहे. या फोटोत विमानाचा अपहरणकर्ता एल्डीन मुस्तफा हा बेनच्या शेजारी उभा आहे. त्याने अंगाला स्फोटकेही बांधली आहेत. (ही स्फोटके खोटी असल्याचा खुलासा झाला होता.)


आता बेनने केलेल्या या साहसाची चर्चा इंटरनेटवर सुरू आहे. खरं तर पहिल्यांदा या अपहरणकर्त्यासोबत अपलोड केलेल्या सेल्फीतील ही व्यक्ती कोण आहे याची चर्चा सुरू होती. नंतर मात्र त्याच्या बहिणीने आणि मित्रांनी त्याची ओळख पटवली. आता या व्यक्तीची प्रतिक्रिया येण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.