वॉशिंग्टन : अमेरिकच्या दोन खासदारांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधीसभेत विधेयक मांडलंय.


नवाझ शरीफ यूएनमध्ये...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन सिनेटच्या दहशतवादविरोधी समितीचे प्रमुख काँग्रेसमन टेड पो आणि त्यांच्या सहकारी दाना रोहरबाकर यांनी हे विधेयक प्रतिनिधी सभेत सादर केलंय. महत्त्वाचं म्हणजे, यूएन जनरल असेम्ब्लीमध्ये पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भाषणापूर्वी घडलेला हा घटनाक्रम पाकिस्तानसाठी शरमेची गोष्ट मानली जातेय. नवाझ शरीफ यूएनमध्ये काश्मीरचा मुद्दा उचलून धरणार आहेत.


'मित्र राष्ट्र असूच शकत नाही'


'पाकिस्तान स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररीझम अॅक्ट' असं या विधेयकाचं नाव आहे. पाकिस्तान विश्वासघातकी राष्ट्र असून इस्लामाबादनं नेहमीच अमेरिकेच्या शत्रूंना मदत करत आलाय. ओसामा बिन लादेनपासून हक्कानी नेटवर्कपर्यंत सगळ्याच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना पाकमध्ये संरक्षण मिळतंय. शिवाय त्याचे सबळ पुरावेही आहेत.  त्यामुळे पाकिस्तान हा दहशतवादविरोधी लढाईतला अमेरिकेचे मित्र राष्ट्र दावा खोटा आहे, असं टेड पो यांचं म्हणणं आहे.


'पाकला पैसे देणं बंद करा'


पाकिस्तानला त्यांच्या धोकेबाजीसाठी पैसे देणं बंद करण्याची आता वेळ आलीय... आणि दहशतवादी घोषित करून पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्यात यावी, असंही त्यांनी म्हटलंय. जम्मू-काश्मीरमधील उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचीही टेड यांनी निंदा केलीय.


याआधीही झाली होती चर्चा... 


याआधी १९९३ साली पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करण्याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी, पाकनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हाताशी धरून मुंबईतील बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. या स्फोटांमध्ये २५९ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता औपचारिक चर्चा पुन्हा एकदा सुरु झालीय.