विजय माल्ल्याची अटक आणि सुटका
कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याला काही वेळातच जामीन मंजूर झालाय. त्यामुळे, त्याच्या भारताकडे होणारं प्रत्यांतर कधी? असा प्रश्न समोर आलाय.
नवी दिल्ली : कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याला काही वेळातच जामीन मंजूर झालाय. त्यामुळे, त्याच्या भारताकडे होणारं प्रत्यांतर कधी? असा प्रश्न समोर आलाय.
वेस्टमिन्स्टर कोर्टाकडून हा जामीन मंजूर करण्यात आलाय. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी माल्यावर कारवाई करत त्याला अटक केली होती. सकाळी 9.30 च्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) 2016 पासून फरार असलेल्या माल्याला स्कॉटलंड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर लंडनमधील एका कोर्टात त्याला सादर करण्यात आलं.
माल्यावर भारतीय बँकांचं 9000 करोड सहीत एकूण 12,000 करोड रुपयांहून अधिक कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. माल्ल्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय टीम लंडनमध्ये जाणार आहे... परंतु, जामीन मिळाल्यानंतर त्याच्या भारताकडे होणाऱ्या प्रत्यार्पणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
विजय माल्याला अटक वेस्टमिन्स्टर कोर्टाच्या आदेशानंतर झालीय, हे विशेष... मार्च 2016 रोजी कर्जबुडव्या माल्या ब्रिटनमध्ये पळून गेला होता. जानेवारी 2017 मध्ये सीबीआयनं त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं होतं. भारत सरकारनं 8 फेब्रुवारी रोजी माल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटन सरकारकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर, 24 मार्च रोजी माल्याला भारताकडे प्रत्यर्पण करण्याची भारताची मागणी ब्रिटन सरकारनं मंजूर केली होती.