बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन झालेय. ते ७० वर्षांचे होते.
मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन झालेय. ते ७० वर्षांचे होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून ते कॅन्सर आजाराने त्रस्त होते. या महिन्यातच त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काही दिवसांपूर्वीच विनोद खन्ना यांचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसत होती.
१९६८ ते २०१३ या कालावधीत त्यांनी तब्बल १४१ सिनेमांमध्ये काम केले. मेरे अपने, मेरा गांव मेरा देश, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, कच्चे धागे, अमर अकबर अँथनी, राजपूत, कुर्बानी, कुदरत, देवयान, कारनामा, सूर्या, जुर्म यासारखे त्यांचे अनेक सिनेमे गाजले. सिनेसृष्टीसोबतच ते राजकारणातही व्यग्र होते.
१९६८मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर मेरे अपने या सिनेमातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. मेरा गाव मेरा देशमध्ये त्यांनी निगेटिव्ह रोल केला होता. या भूमिकेलाही प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच गाजला.
१९८२मध्ये जेव्हा विनोद खन्ना यांची कारकीर्द उंचीवर असतानाच त्यांनी सिनेसृष्टीतून तात्पुरता निरोप घेतला. मात्र ५ वर्षानंतर त्यांनी पुन्हा कमबॅक करताना इन्साफ आणि सत्यमेव जयते हे दोन हिट सिनेमे दिले.