लॉस एन्जेलिस : हॉलीवूडविश्वात ब्रँजेलिना नावाने ओळखली जाणारी अँजेलिना जॉली आणि ब्रॅड पिट ही प्रसिद्ध जोडी लवकरच विभक्त होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँजेलिनाने ब्रॅड पिट याच्याशी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. अँजेलिना आणि ब्रॅड हे गेल्या १० वर्षांपासून नातेसंबंधात होते, त्यानंतर २०१४ साली ते विवाहबद्ध झाले होते. सहा मुलांचे आई-वडील असलेले ब्रॅन्जेलिना ऑगस्ट २०१४ विवाहबंधनात अडकले होते. 'मिस्टर अॅण्ड मिसेस स्मिथ' चित्रपटाच्या निमित्ताने २००४ मध्ये एकत्र आलेल्या या जोडप्यानं तेव्हापर्यंत लग्न केलं नसलं तरी ते एकत्र राहत होते. या पाच वर्षांच्या कालावधीत तीन मुलांना जन्म दिला, तर तीन मुलांना दत्तक घेतलं होतं.


लग्नानंतर दोनच वर्षांत या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. 'टीएमझेड'नं दिलेल्या माहितीनुसार, ४१ वर्षीय अभिनेत्रीनं गेल्या सोमवारी कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केलीय. यासोबत तिनं आपल्या सहा मुलांचा ताबादेखील मागितलाय. ब्रॅड मुलांना वेळोवेळी भेटू शकतो, असंही तिनं म्हटलंय.  


गेल्या काही दिवसांपासूनच दोघांमध्ये वाद-विवाद सुरु असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, दोघांपैकी कुणीही याबाबत अधिकृतरित्या काहीच सांगितलं नव्हतं. अँजेलिनाने नुकतंच 'काहीही झालं तरी, मी ब्रॅडसोबतच राहीन' असं वक्तव्यही केलं होतं.


अँजेलिनाला सहाही मुलांना आपल्यासोबतच ठेवायचं आहे. ब्रॅड ज्याप्रकारे मुलांना सांभाळतो, त्यावरुन अँजेलिना नाराज आहे. ब्रॅडसोबत अँजेलिनाचं हे तिसरं लग्न होतं. तर ब्रॅडचं हे दुसरं लग्न होतं.