मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठमोळ्या 'कासव'सहीत इतर भाषांतील चित्रपट आणि लघुपट पाहण्याची संधी लवकरच प्रेक्षकांना मिळतेय 'चित्रभारती' या चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभात चित्र मंडळ आणि ठाणे आर्ट गिल्ड (TAG) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिनेमॅटीक सिनेव्हिजन यांच्या सहकार्याने 'चित्रभारती' या भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. १५ मे ते १९ मे २०१७ पर्यंत माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्युटमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 


यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या भारतीय चित्रपट, लघुपट व माहितीपटांचे प्रदर्शन चित्रभारतीमध्ये करण्यात येणार आहे.


कासव, एक अलबेला, परिसस्पर्श...


'चित्रभारती' महोत्सवाचा शुभारंभ सुवर्णकमळ विजेता चित्रपट कासव (दिग्द. सुमित्रा भावे, सुनिल सुकथनकर) आणि आबा, ऐकताय ना? (दिग्द. आदित्य जांभळे) या लघुपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. पाच दिवसांच्या या महोत्सवात लेथ जोशी (दिग्द. मंगेश जोशी), एक अलबेला (दिग्द. शेखर सरतांडेल), मुक्तिभवन,  हंदूक (आसामी ), व्हेन द वूड ब्लूम (मल्याळम), के सेरा सेरा (कोंकणी) हे चित्रपट त्याचबरोबर फायरफ्लाईज इन द अॅबिस आणि परिसस्पर्श (प्रभाकर पेंढारकर जीवन कर्तृत्व) हे माहितीपट दाखवण्यात येणार आहेत.


संपर्कासाठी...


चित्रभारती आयोजित लघुपट स्पर्धेतील निवडक लघुपटदेखील महोत्सवात पहायला मिळणार आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महोत्सवात उपस्थित राहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांनी प्रभात चित्र मंडळाच्या कार्यालयात प्रतिनिधी नोंदणी करावी... त्यासाठी ०२२-२४१३ १९ १८ या क्रमांकावर किंवा प्रभात कार्यालय, शारदा सिनेमा बिल्डिंग, पहिला मजला, नायगाव, दादर (प), मुंबई इथे संपर्क साधा..