मुंबई : सैराट सारख्या गाजलेल्या आणि एलिझाबेथ एकादशी या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर झी स्टुडिओज् आता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा चि. व चि. सौ. कां. हा नवा चित्रपट १९ मे प्रदर्शित होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी सिनेमा सृष्टीला आणखी एक दर्जेदार सिनेमा मिळणार आहे. नुसतं मनोरंजनच नाही तर अनेक सामाजिक गोष्टींवर देखील या सिनेमाने भाष्य केलं आहे. अतिशय नवीन संकल्पना घेऊन हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.


मुला-मुलींच्या विवाहासाठी एकत्र आलेली दोन कुटुंब आणि मग एकमेकांना ओळखण्यासाठी लग्नाआधीच मुलीने काही दिवस मुलासोबत राहण्याचा घातलेला घाट असा या सिनेमाचा प्रमुख भाग आहे. मृण्मयी गोडबोले म्हणजेच सावित्री यात प्राण्यांची डॉक्टर दाखवण्यात आली आहे तर ललित प्रभाकर म्हणजेच सत्या याची सौरयंत्र बनवण्याची कंपनी असते. हे दोघेही सिनेमात प्रमुख भूमिकेमध्ये आहेत.


सत्या आणि सावित्रीचं कुटुंबही यामध्ये फार मजेशीर दाखवण्यात आलं आहे. बाल कलाकाराच्या भूमिकेत असणारा पुष्कर लोणारकरनेही यामध्ये जबरदस्त भूमिका केली आहे. या सिनेमात तो तुमचं खूप मनोरंजन करतांना दिसणार आहे. झी मराठीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून आधीच घराघरात पोहोचलेला ललित प्रभाकर आता सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 


एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना या सिनेमातून पाहायला मिळणार असल्याने हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल. चला हवा येऊ द्यामधले कलाकार भारत गणेशपुरे यामध्ये सूत्रधाराच्या भूमिकेत आधूम मधून तुमचं मनोरजंन करणार आहेत. लग्न, सामाजिक प्रश्न आणि मनोरंजन असा तिहेरी संगम या सिनेमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सहकुटुंब पाहावा असा हा सिनेमा ९ मेला प्रदर्शित होत आहे.