सिनेमा : वजनदार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोड्युसर : विधी कासलिवाल


दिग्दर्शक/लेखक : सचिन कुंडलकर


कलाकार : सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील, चेतन चिटणीस


जयंती वाघधरे, झी मीडिया


मुंबई : आज बिग स्क्रिनवर सचिन कुंडलकर दिग्दर्शित, सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर स्टारर 'वजनदार' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? हा प्रश्न जर तुम्हाला सतावत असेल, तर डोन्ट वरी... आम्ही सांगतोय या सिनेमाची ट्रू स्टोरी...


ढोबळ कथानक...


कावेरी आणि पूजा या दोघींची ही गोष्ट... ज्या भूमिका साकारल्या आहेत सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी... कावेरी आणि पूजा दोघींही चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघीही खाण्याच्या शौकिन आहेत. दिवसभर चरत 


राहणाऱ्या... एक नंबर फुडी... त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्या नकळत त्यांचं वजन वाढतं. त्यांच्या खाण्यामुळे वजनावर मात्र त्यांचा कंट्रोल नाही. 


कावेरीचं (सई ताम्हणकर) लग्न झालंय... सासरी आल्यावर तिचं आयुष्य बदललंय. कावेरीला डान्सची भलतीच आवड आहे. एक दिवस दोघी मनसोक्त एनजॉय करायला एका पबमध्ये जातात. तिथे या वजनदार मैत्रिणींचा डान्स बघायला लोकांची गर्दी होते... आणि मग या दोघींना उत्साहाच्या भरात टेबलवर जाऊन नाचण्याचा मोह आवरता आवरत नाही. फायनली दोघी टेबलवर नाचत असताना, अचानक टेबल तुटतो आणि दोघी खाली पडतात. त्यानंतर या दोघींचा हा डान्स व्हिडिओ सोशल साईट्सवर असा काही वायरल होतो की दोघी हैराण होतात.


फायनली या संपूर्ण लाजिरवाण्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी दोघीही वजन कमी करायचा निश्चय करतात. याच दरम्यान आलोकची एन्ट्री होते. आलोक जी व्यक्तिरेखा साकारलीय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं... त्यानंतर काय घडतं... इनशॉर्ट अशा काहीशा पार्श्वभूमिवरची 'वजनदार' या सिनेमाची गोष्ट आहे.


'वजनदार' प्रिया


'वजनदार' या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांचं आहे. सिनेमाची कथा अगदी सरळ साधी आहे, त्यासाठी कलाकारांनी किती कष्ट घेतलेत हेही स्र्किनवर पाहताना कळून येतं. विशेष उल्लेख करावासा वाटतो अभिनेत्री प्रिया बापटचा जिनं खरंच या कॅरेक्टरसाठी बऱ्यापैंकी वजन वाढवलंय. प्रियाचा अभिनयही सुंदर झालाय.


गृहिणीच्या भूमिकेतील सई


सई ताम्हणकरनं 'वजनदार'मध्ये एका गृहिणीची व्यक्तिरेखा साकारली आहे, त्यामुळे सिनेमात जास्तीत जास्त वेळा ती साड्यांमध्ये दिसतेय. खरं सांगायचं तर सई सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत कुठेही जाड किंवा वजनदार वाटत नाही. सिनेमासाठी तिनं वजन वाढवलंय हे कुठेही जाणवंत नाही, त्यामुळे तिच्या कॅरेक्टरला पाहिजे तेव्हढं 'वजन' मिळालेलं नाही... ज्यामुळे हवा तो इम्पॅक्टही स्क्रिनप्लेमध्ये दिसून येत नाही. दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी या गोष्टी काळजी घ्यायला हवी होती. सिनेमाच्या कथेला आणि एकूणच दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी छान ट्रीटमेन्ट दिली आहे. कथा जरी चांगली असली तरी स्क्रिनप्ले मात्र फसलाय... ज्यामुळे सिनेमाचा फ्लोदेखील प्रभावीत होतो.


ग्लॅमरस पुरुष व्यक्तिरेखा


सिनेमातल्या प्रमुख व्यक्तिरेखा कावेरी आणि पूजा खरंतर आपापलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात... आणि याच दरम्यान आलोक, ओंकार, मोहित, माईक हे कॅरेक्टर्स एक-एक करुन सिनेमात एन्ट्री घेतात. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील, चेतन चिटनीस आणि समीर धर्माधीकारी यांनी सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सिद्धार्थ चांदेकर असो... चिराग असो किंवा चेतन चिटनीस... असं कायम म्हटलं जातं की सुंदर मुलींमुळे सिनेमात ग्लॅमर कोशंट वाढतं. मात्र या सिनेमात या मुलांनी ती जागा भरुन काढलीय.


सिद्धार्थ चांदेकर आणि प्रियाची कॅमिस्ट्री स्क्रीनवर छान दिसतेय. सिनेमात सुंदर चेहरे पहायला मिळतात, ज्याचं श्रेय खरं तर सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग यांना जातं. संगीतकार अविनाश विश्वजीत या जोडीनं सिनेमाला संगीत दिलंय. 'वजनदार'चं संगीत छान झालंय... हा एक ठिकठाक सिनेमा आहे. सिनेमा पहाताना अनेकदा आपण वजन कमी करण्याकरिता एका 'वर्कशॉप'साठी आलोय की काय? असा प्रश्न पडतो. 


तेव्हा हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही 'वजनदार' या सिनेमाला देतोय २.५ स्टार्स...