मुंबई: बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना यांच्यामधला वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. याबाबत आता हृतिक रोशननं आपली बाजू मांडण्यासाठी पत्रक प्रसिद्ध केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना ज्या ई-मेल आयडी बद्दल बोलत आहे तो माझा नाही, तसंच माझं आयुष्य गोपनिय ठेवण्यासाठी कायद्याचीही मदत घेतली असल्याचं हृतिक म्हणाला आहे. 


काय आहे हृतिकच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये ?


जेव्हा कोणतीही वैयक्तिक गोष्ट समोर येते तेव्हा त्याबाबत वाद होणं आणि चर्चा होणं स्वाभाविक आहे. लोक या गोष्टींवर विश्वास ठेवतात पण त्यांना सगळ्याच गोष्टी माहिती नसतात. 


या प्रकरणामध्ये जेवढे लोक जोडले गेले आहेत, त्यांचा भावनांचा विचार करून मी कायद्याची मदत घ्यायचं ठरवलं आहे. माझ्या आयुष्यातल्या वैयक्तिक गोष्टी बाहेर येऊ नयेत अशी माझी इच्छा होती. 


गप्प राहणं ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा कुटुंब आणि प्रतिष्ठेचा प्रश्न येतो तेव्हा याबाबत बोलणच योग्य असतं. मी हे स्पष्ट करु इच्छितो की hroshan@email.com हा ई-मेल आयडी माझा नाही. माझ्या नावाच्या या फेक आयडीबाबत मी 12 डिसेंबर 2014 ला मुंबई सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. 


हा सगळा मामला आयडेंटिटी चोरण्याचा आहे. 5 मार्च 2016 पासून पोलिसांकडून याच्या तपासाला वेग आला आहे, आणि माझ्या नावानं ई-मेल आयडी बनवणाऱ्याचा शोध सुरु आहे. मानसिक स्थिती हा एक संवेदनशील मुद्दा आहे. याला गंभीरपणे घेतलं पाहिजे. मी कोणाबाबतही अशी कमेंट करणार नाही. माझं नाव घेऊन कोणाच्याबद्दल जर असं काही पसरवलं जात असेल तर ती फक्त तथ्याशी छेडछाड आहे. मला गप्प राहायला सांगण्यात आलं होतं, त्यामुळे गेली 2 वर्ष मी गप्प बसलो होतो.