मुंबई : सूर्य आणि चंद्र अस्तित्वात असेपर्यंत जी महाकाव्ये या पृथ्वीतलावर जिवंत राहतील असा ज्यांना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे ती महाकाव्ये म्हणजे रामायण आणि महाभारत. रामायणावर भारतात आजवर अनेक कलाकृती तयार झाल्या आहेत. आता मात्र या हॉलिवूडलाही या महाकाव्याने भुरळ घातली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलिवूडमधील तीन तरुण कलावंत विनीत सिन्हा, शॉन ग्रॅहम आणि अमेरिकेतील क्रिएटिव्ह डिरेक्टर रॉनी ऑलमन रामायणाची हीच कथा भव्यदिव्य रुपात आता जगासमोर आणणार आहे. 


ही नवी कलाकृती निर्माण करण्यासाठी ते शक्य तितक्या आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करणार आहेत. हा सिनेमा 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' किंवा इतर कोणत्याही हॉलिवूडच्या सुपरहिरो फिल्म इतकाच दमदार असेल अशी माहिती या कलाकारांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे. 'बॅटमॅन, सुपरमॅन, पोकेमॉन अशा कलाकृतींचे जगभरात चाहते आहेत. पण, यात कोणताही भारतीय सुपरहिरो दिसत नाही. म्हणूनच आम्ही जगाला आता ही कथा सांगणार आहे,' असे विनीत म्हणाला. 


हा चित्रपट 3D तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात येणार आहे. बाहुबलीच्या बजेटपेक्षा दुप्पट म्हणजे तब्बल ५०० कोटी भारतीय रुपये इतके असणार आहे. 


विनीत आणि शॉनच्या मते भारतीय प्रेक्षक आणि जगभरातील प्रेक्षक यांच्या अपेक्षांचा योग्य मेळ साधून अशा एखाद्या सिनेमाची निर्मिती करणे हे त्यांच्यापुढील सर्वात कठीण आव्हान असणार आहे. जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस ही कलाकृती उतरवताना भारतीयांनाही ती आपलीशी वाटायला हवी, अशी त्यांची अपेक्षा आहे. 


हनुमान आणि रावणाच्या व्यक्तीरेखांची आखणी करणे त्यांना सध्या सर्वात जास्त आव्हानात्मक वाटते आहे. यी दोन्ही व्यक्तीरेखांना स्वतःचे अनेक विविध पैलू आहेत. त्यांचा नीट ताळमेळ राखणे या कलाकारांना गरजेचे वाटते. 


या चित्रपटातील कलाकार प्रामुख्याने भारतीय असणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग इंग्रजीत झाले तरी त्याचे विविध भारतीय भाषांमध्ये आणि अनेक जागतिक भाषांमध्ये डबिंग केले जाणार आहे. 


हा चित्रपट तयार करण्यासाठी wishberry.in या संकेतस्थळावरुन ५० लाख रुपये सामान्य व्यक्तींकडून जमवले जाणार आहेत.