माहिरा खानकडून दहशतवादी हल्ल्यांचा निषेध, पण उरीचा उल्लेख नाही
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 19 जवान शहीद झाले.
कराची : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 19 जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली. या सगळ्या वादावर पाकिस्तानी कलाकार माहिरा खाननं मौन सोडलं आहे.
जगातल्या कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाची मी निंदा करते आणि जगात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करते अशी प्रतिक्रिया माहिरा खाननं दिली आहे. माहिरानं फेसबूकवर ही पोस्ट टाकली आहे. दहशतवादी हल्ल्याची माहिरानं निंदा केली असली तरी तिच्या फेसबूक पोस्टवर कुठेही उरीमधल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नाही.
मागच्या पाच वर्षांपासून मी चित्रपटसृष्टीमध्ये देशात आणि देशाबाहेर काम करत असताना मी माझ्या देशाचा अभिमान कायम राहील याची काळजी घेतली, असंही माहिरानं या फेसबूक पोस्टमध्ये म्हणलं आहे. शाहरुख खानच्या रईसमध्ये माहिरा मुख्य भूमिकेमध्ये आहे. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर रईस हा चित्रपट प्रदर्शित होणार का नाही याबाबत शंका कायम आहे.