श्रीदेवीच्या मॉम चित्रपटाचं पोस्टर रिलीज
‘इंग्लिश विंग्लिश’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केल्यानंतर अभिनेत्री श्रीदेवी आणखी एका चित्रपटात झळकणार आहे.
मुंबई : ‘इंग्लिश विंग्लिश’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केल्यानंतर अभिनेत्री श्रीदेवी आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. ‘मॉम’ चित्रपटात श्रीदेवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांची ही निर्मिती असेल.
पाकिस्तानी कलाकारांविरोधात फतवा निघाल्यानंतर ‘मॉम’ चित्रपटाला फटका बसला होता. अदनान सिद्दीकी आणि सजल अली हे कलाकार अनुक्रमे श्रीदेवीच्या पती आणि मुलीच्या भूमिकेत आहेत. श्रीदेवीसोबतच अक्षय खन्ना, अभिमन्यू सिंग, पितोबाश त्रिपाठी हे कलाकार चित्रपटात आहेत, तर नवाझुद्दिन सिद्दीकी पाहुण्या कलाकाराच्या रुपात झळकणार आहे.
रवी उद्यावर यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘मॉम’ या चित्रपटाचं कथानक गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. ‘मॉम’ १४ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. श्रीदेवीने ट्विटरवरुन या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं आहे. जेव्हा एका आईला ललकारता, असं कॅप्शन देऊन हे पोस्टर शेअर करण्यात आलं आहे.