‘पसंत आहे मुलगी’मध्ये संजय मोने-गिरीश ओक यांची जुगलबंदी
डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने यांची जुगलबंदी रंगणार आहे, झी मराठीवरील ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेत.
मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये अभिनयाने वेगळी छाप पाडणारे डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने यांची जुगलबंदी रंगणार आहे, झी मराठीवरील ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेत.
कुमलेप्रमाणे यातही गिरीश ओक पंतांच्या सकारात्मक भूमिकेत आहेत तर संजय मोने हे खलनायकाची भूमिका साकारत आहेत. या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
काय आहे कथा?
देवसाखरी गावातील आनंद महाराजांच्या मठाचं मानाचं पद पंतांकडे आहे. परंपरेशी तडजोड नाही हा पंतांचा स्वभावधर्म. त्यांच्या शब्दाला गावात मोठा मान आहे त्यामुळे आनंद महाराजांच्या मठाचा आणि देवसाखरीचा संपूर्ण कारभार हा त्यांच्या शब्दावर चालतो. कृष्णकांत कुलकर्णी हे या गावातील राजकीय महत्वाकांक्षा असणारं व्यक्तिमत्व. पंतांना मिळणारा हा मान मराताब कृष्णकांत कुलकर्णीच्या डोळ्यांत खुपतोय म्हणूनच पंताची ही प्रतिष्ठा स्वतःकडे यावी यासाठी तो सतत काही तरी खेळ्या रचतोय पण त्यात मात्र कधीच यशस्वी ठरत नाही.
पंतांची ही सत्ता स्वतःकडे घेण्यासाठी आता कुलकर्णीच्या डोक्यात पंतांच्या घरात फूट पाडण्याचा कुटील डाव आकार घेतोय. यासाठी तो स्वतःच्याच मुलीला मोहरा बनवून खेळी खेळणार आहे. आपली मुलगी नीता हिचा विवाह पंतांचा धाकटा मुलगा पुनर्वसूशी (वासू) करून देण्याचा त्याचा मानस आहे. नीता या घरात नांदायला गेली की तिच्याआधारे या घरात फूट पाडून ती सत्ता बळकावयाची असा छुपा मनसुबा कुलकर्णीच्या डोक्यात आहे. तिकडे पुनर्वसू मात्र उर्मीच्या प्रेमात आहे. त्याला तिच्याशीच लग्न करायचंय. इकडे कुलकर्णी साळसूदपणाचा आव आणत पंतांकडे नीताच्या लग्नाची गोष्ट बोलून दाखवतो आणि पंतही नीताला आपली सून बनवून घेण्यास तयार होतात. पंत आपला निर्णय वासूला ऐकवतात. पंतांचा शब्द नाकारण्याची हिंमत वासूमध्ये नाही. त्यामुळे तोही या लग्नासाठी तयार होतो.
या दोघांचा विवाह लावून देण्यात आणि आपले मनसुबे खरे करण्यात कुलकर्णी यशस्वी होतो का ? आणि हा विवाह झाला नाही तर त्याची पुढची खेळी काय असेल ? हे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं असेल. या दोन दिग्गज अभिनेत्यांची ही जुगलबंदी झी मराठीवरील ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेतून सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वा. प्रेक्षकांना बघायला मिळेल.