मुंबई : प्रदर्शनाआधीच सिनेमा लीक होण्याचं ग्रहण अभिनेता रजनीकांतला लागलं आहे. कारण बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित कबाली हा सिनेमाही ऑनलाईन लीक झाला आहे. कबाली रिलीज होण्यासाठी अजून तीन दिवस बाकी आहे. येत्या 22 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. मात्र त्यापूर्वीच हा सिनेमा विविध वेबसाईट्सवर उपलब्ध असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कबाली टीमने तातडीने संबंधित वेबसाईट्सशी संपर्क करुन, सिनेमा हटवण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट अद्याप चित्रपट शेअरींग साइट असलेल्या टोरन्टवर आलेला नाही. 


काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याची पायरेटेड कॉपी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मद्रास हाय कोर्टात संपर्क साधला होता. १८० पेक्षाही अधिक संकेतस्थळांवरून या चित्रपटाचे बेकायदेशीर डाउनलोड थांबवण्यासाठी निर्माते एस थानु यांनी याचिकाही दाखल केली होती. ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, सुलतान, मांझी, सैराट यासारखे सिनेमे लीक झाले होते. त्यात आता कबालीचाही समावेश झाला आहे.या सिनेमात रजनीकांत डॉन कबालीश्वरनच्या भूमिकेत असून, मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेही मुख्य भूमिकेत आहे. तैवानचा सुपरस्टार विनस्टॉन चाओ याने सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे.