उज्ज्वल निकम नोकरांना पगार देत नाही, थुकरटवाडीच्या शांताबाईचा आरोप
सरकारी वकिल आणि सुप्रसिद्ध न्यायालयीन खटले हा उल्लेख आला की डोळ्यासमोर येणारं एकमेव नाव म्हणजे अॅड. उज्ज्वल निकम. यावेळी थुकरटवाडीच्या शांताबाई (भाऊ कदम) यांनी उज्ज्वल निकम यांच्या घरी काम केल्याचे सांगितले.
मुंबई : झी मराठीवर हास्याची कारंजी फुलवणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये सरकारी वकिल आणि सुप्रसिद्ध न्यायालयीन खटले हा उल्लेख आला की डोळ्यासमोर येणारं एकमेव नाव म्हणजे अॅड. उज्ज्वल निकम. यावेळी थुकरटवाडीच्या शांताबाई (भाऊ कदम) यांनी उज्ज्वल निकम यांच्या घरी काम केल्याचे सांगितले.
शांताबाई म्हणाल्या की उज्ज्वल निकम कधी पगार द्यायचे नाही. काय द्यायचे नाही पगार याचं कारण सांगितल्यावर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला.
थुकरटवाडीच्या सरपंचांनी उज्ज्वल निकम यांची खास ओळख करून दिली.
यावेळी खटल्यांमागचे काही खास किस्से या भागांमधून त्यांच्याचकडून प्रेक्षकांना ऐकायला तर मिळतीलच पण त्याच सोबत घरामध्ये ते कशाप्रकारे युक्तिवाद करतात आणि घरात नेमका स्वभाव कसा आहे हे ऐकायला मिळणार त्यांच्या पत्नीकडून.
झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' च्या या आठवड्यात संक्रातीच्या सणाचं औचित्य साधत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत काही खास जोड्या. विविध क्षेत्रांत आपल्या कार्याने आपला आणि मराठीपणाचा ठसा उमटविणा-या काही खास लोकांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू उलगडण्याचा प्रयत्न या भागांमधून होणार आहे.
क्रिकेटच्या विश्वात केवळ मैदानावरच नाही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसूनही फटकेबाजी करता येते हे दाखवून देणारे सुप्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले सपत्निक या भागात उपस्थित राहिले.
याशिवाय या भागात सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवि जाधव आणि पत्नी मेघना जाधव, लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक आणि पत्नी मंजिरी ओक यांच्याकडूनही अनोक मजेदार गोष्टी ऐकायला मिळतील.
राधा ही बावरी फेम अभिनेत्री श्रुती मराठे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतरची तिची ही पहीलीच मकर संक्रात. यानिमित्ताने ती आपला जोडीदार गौरव घाटणोकरसह यात सहभागी झाली होती. त्यांच्याचकडूनही अनेक धम्माल किस्से प्रेक्षकांना बघायला मिळतील. हे दोन्ही भाग येत्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० वा. झी मराठी वरुन प्रसारित होतील.