मुंबई : 'सिंगल मदर' म्हणून दोन मुलींची आई असलेल्या अभिनेत्री सुष्मिता सेन हिचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. हे पत्र एका आईनं (सुष्मितानं) आपल्या मुलीला (रेनेला) लिहिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या वयात मुली जबाबदारीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात त्या वयात सुष्मितानं एका मुलीला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर काही वर्षांनी तिनं आणखी एक मुलगी दत्तक घेतली होती. 


नुकतंच, सुष्मितानं सोशल अॅप 'इन्स्टाग्राम'वर एन्ट्री केलीय. त्यानंतर तिनं आपले आपल्या मुलींचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत. ते पाहून अनेक जण भावूक झालेत. यामध्येच सुष्मितानं आपल्या मोठ्या मुलीसाठी - रेनेसाठी २०१३ साली लिहिलेलं एक पत्रही शेअर केलंय.  



काय लिहिलंय सुष्मितानं आपल्या पत्रात... 


माझी लाडकी रेने, 


तू देवाचं एक सुंदर रचना आहेस... आपल्या आईच्या हृदयातून तू निघालीस. तू इथं आपल्या भवितव्याला मूर्त रुप देण्यासाठी दाखल झालीयस. बाळा, तुला जितकं शिकता येईल तेव्हढ शिकत राहा... हीच तुझी सर्वांत मोठी ताकद ठरेल.


तू तुझा मार्ग स्वत: निवड... निसर्गाला आपला मित्र मान... आपल्या शब्दांचा मान राख... आपल्या शिक्षकांना मान दे... वेळप्रसंगी त्यांची मदत घे... आपल्या स्वप्नांना कधीही विसरु नकोस. मेहनत करण्याला कधीही घाबरू नकोस... धैर्य सोडू नकोस... स्वत:वर विश्वास ठेव आणि देवावरही... 


तुझ्याकडील गोष्टी लोकांसोबत वाटायला शिक... नेहमी आनंद राहा... साहसापासून कधीही लांब राहू नकोस, ते तुला तुझ्यातच सापडेल. संधी मिळव... त्याच तुला पुढच्या वाटचालीत मदत करतील.


योग्य वेळेची वाट पाहा... तुला माहित असायला हवं की तुला कधी माफी मागायचीय... वाकणं शिक परंतु कधीही तुटून जाऊ नकोस... नेहमी नव्या नव्या चुका कर पण जुन्याच चुका मात्र पुन्हा करू नकोस... नेहमी सकारात्मक राहा... 


मी आणि तुझी छोटी बहिण तुझ्यावर खूप प्रेम करतो. आम्हाला तुला नेहमी आनंदी पाहायचंय. मी दररोज देवाचे आभार मानते कारण त्यानं मला तुझी आई बनवलं.


मला तुझा खूप अभिमान आहे... आता वेळ आलीय की जगालाही माहीत पडावं की तू किती अमेझिंग आहेस... खूप खूप प्रेम... 


आई


या पत्रासोबत सुष्मितानं एक व्हिडिओही शेअर केलाय. रेने जेव्हा खूप लहान होती तेव्हा सुष्मिता तिच्यासोबत खेळताना या व्हिडिओत दिसतेय.