मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी यांना राजमुद्रा कला अकादमीने यंदाचा राजमुद्रा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मादक अदा आणि थिरकायला लावणाऱ्या दिलखेचक नृत्याने घायाळ करणाऱ्या  गेली दोन दशके लावणी क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरीची दखल राजमुद्रा अकादमीने घेतली. आपल्या नृत्यशैलीने चाहत्यांना बेधुंद करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी यांची राजमुद्रा जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.  


जयश्री टी या आपल्या भन्नाट नृत्य आणि अभिनयशैलीमुळे फक्त मराठी सिनेसृष्टीपुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीतर त्यांनी हिंदीबरोबर गुजराती रंगमंच आणि सिनेविश्वही गाजवले. तसेच या सोहळ्यात लावण्यतारका सीमा पोटे-नारायणगावकर आणि चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले यांनाही सन्मानित केले जाणार असल्याची माहिती राजमुद्राच्या शंकर पिसाळ यांनी दिली.


दरम्यान, एकापेक्षा एक अशा लावण्यवतींच्या भन्नाट नृत्याने गेली दहा वर्षे लावणीचा धमाका सादर करणाऱ्या गुलजार गुलछडीच्या १३०० व्या प्रयोगाची सप्तरंग उधळणही रविवारी सायंकाळी ५.३०वाजता प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात अनुभवायला मिळेल. या प्रयोगाच्या निमित्ताने गुलजार गुलछडीचा महालावणी महोत्सवही आयोजित केला जाणार आहे.


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा अर्थातच लावणीला जपण्यासाठी धडपडणाऱया राजमुद्राने आपला लावणी अविष्कार गुलजार गुलछडीच्या माध्यमातून रंगमंचावर आणताना दहा लावण्यवती नृत्यांगणाच्या ठसकेबाज लावण्या सादर करणार आहेत. या उधळणीत पारंपारिक लावणीसह ठसकेबाज, श्रृंगारिक, खडी आणि बैठकीच्या लावणीचे सप्तरंग लावण्यप्रेमींना एकाच मंचावर पाहायला मिळेल.