चंद्रपूर : शहरातील समतानगर परिसरातील सोनू सहारे या १२ वर्षीय मुलाचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. पोलिसांनी या मुलाच्या घराशेजारी राहणाऱ्या देवीप्रसाद देवसरे या तरुणाला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अय्यप्पा मंदिर परिसरात असलेल्या शक्तीनगर कोळसा वसाहत भागातील जंगलात काल रात्री सोनू सहारे या १२ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची एकच लाट उसळली. दुर्गापूरच्या समतानगर येथील घरात मोबाईलवर गेम खेळत असतांना गुरुवारी दुपारी सोनू अचानक बेपत्ता झाला होता. 
अनेक ठिकाणी शोध घेऊनही त्याचा पत्ता लागला नाही आणि काल दुपारी त्याचा वडिलांना चार लाखांची खंडणी देण्यासाठी फोन आला. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. 


पोलिसांनी खंडणीसाठी आलेल्या फोन चा IMEI क्रमांकावरून शोध घेतला असता हा फोन घराशेजारी राहणाऱ्या १९ वर्षीय देवीप्रसाद देवसरे यानेच केल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांना आरोपीचा शोध लागला. या प्रकरणात खंडणीमुळे हत्या झाल्याचे जरी प्राथमिक कारण दिसत असले तरी आरोपीने या प्रकरणात धक्कादायक माहिती दिली आहे.


आरोपीच्या बहिणीचा काविळीने मृत्यू झाला होता. मात्र सोनू सहारेच्या आईने जादूटोणा केल्याचा त्याला संशय होता आणि या रागातूनच ही हत्या केल्याचे सांगितले आहे. पोलिसांना या प्रकरणी आरोपी देवीप्रसाद देवसरे आणि त्याला मदत करणाऱ्या अन्य एका अल्पवयीन आरोपीला देखील अटक केली आहे.