विशाल करोळे, औरंगाबाद : हेमलकशाहून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आलेल्या मादी बिबट्याच्या तीन पिल्लांचा मृत्यू झालाय. रेणूवर चुकीचे उपचार झाल्यामुळे तिची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय. आधीच आमटे कुटुंबीय आणि साथीदार राजापासून दुरावलेली रेणू आता बछड्यांच्या मृत्यूनं आणखी दुखावलीय. या बछड्यांच्या मृत्यूनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश आमटें यांच्या सहवासात मुक्तपणे वाढलेल्या या रेणू नावाच्या या मादी बिबट्यानं मंगळवारी तीन गोंडस पिल्लांना जन्म दिला. पण या तिन्ही बिबट्यांचा मृत्यू झालाय. रेणूला २० दिवसांपूर्वी प्रकाश आमटेंच्या हेमलकसा आश्रमातून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात आणण्यात आलं होतं. पण इथं आल्यापासूनच रेणू दुःखी होती, तिनं अन्नपाणी सोडलं होतं. 


रेणू गर्भवती आहे हे डॉक्टरांना कळलंच नाही?


प्राणीसंग्रहालयाच्या डॉक्टर्सनं तिला बॅक्टेरियल इंफेक्शन झाल्याचा निर्वाळा दिला आणि रेणूवर औषधांचा मारा सुरु झाला... अगदी हाय डोस औषधंही देण्यात आली... पण या सगळ्यात रेणू गर्भवती आहे, याची कुणालाच कल्पना नव्हती. प्राणीसंग्रहालयाचे प्रमुखही याबाबत आता कानावर हात ठेवत आहेत. मायेच्या माणसांपासून दुरावलेली रेणू आता बछड्यांच्या मृत्यूनं आणखी व्याकूळ झालीय.


बछड्यांच्या मृत्यूमुळं आता अनेक प्रश्न जन्माला आलेत.


- प्राणी संग्रहालयातील डॉक्टर्सना रेणू गर्भवती असल्याचं कसं समजलं नाही ?


- २० दिवसांपूर्वी हेमलकसातून औरंगाबादला आणताना रेणूची वैद्यकीय तपासणी झाली होती का?


- रेणू आणि राजा बिबट्याला हेमलकसातून हलवताना वन विभागाला माहिती का देण्यात आली नाही?


- प्राणी संग्रहालयात रेणू अस्वस्थ असताना सखोल वैद्यकीय चाचणी, एक्स रे का केला नाही?


- रेणूला पिल्लं झाल्यानंतरही वन विभागाला कळवणं महापालिकेला गरजेचं वाटलं नाही का?


- पिल्लं झाल्यावरच रेणू गर्भवती होती, हे कळत असेल तर ही प्राणी संग्रहालय प्रशासनाची चूक नाही का?


हे सगळं झाल्यानंतर महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरीया आता सारवासारवीची भाषा करतायत. यात चूक कुणाची हे मात्र ते अजूनही सांगत नाहीत. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता उपमहापौर प्रमोद राठोड यांनी केलीय.  


रेणू गर्भवती असल्याची माहिती २० दिवसांपूर्वी प्रकाश आमटेंनी दिली होती का? याचा तपास करणंही आता गरजेचं आहे. मात्र तूर्तास या दुःखीकष्टी रेणूची काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.