ठाणे : धबधब्याखाली चिंब भिजायचंय... निसर्गाचा आनंद लुटायचाय... आणि हे सर्व करताना नियम आणि धोकादायकचे फलकही विसरायचे.. यामुळे पर्यटकांना जीव गमवावा लागतो. अशा पर्यटन स्थळांवर पोलिसांनाही पर्यटक जुमानत नाही... आणि जीव गमवला की बदनाम होतो तो धबधबा आणि ते पर्यटन स्थळ. पण खरी चूक तर तुमच्या आमच्यासारख्या पर्यटकांची असते हे विसरून कसं चालेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहलीचा आनंद लुटायचा म्हणजे नियम तोडायचे आणि फाजीलपणा करायचा असा आजकालच्या तरुणाईचा समजच झालाय. त्यामुळे जीवही गमवावा लागतो. विशेष:त वर्षा सहलीच्या ठिकाणी धरण, नदी, धबधब्यांच्या परिसरात अशा घटना नेहमीच घडतात. बदलापूर शहरातला कोंडेश्वर धबधबाही यासाठी बदनाम झालाय.  इथला कुंड पर्यटकांसाठी जीवघेणा ठरतोय. धबधब्याच्या प्रवाहात स्व:तला झोकून देत या कुंडात जोरदार सुर मारण्याच्या प्रयत्नात अनेकांनी आजवर जीव गमावलाय. चार वर्षांत 23 जणांनी इथे जीव गमावलाय. 


2013 मध्ये 7, 2014 मध्ये 6, 2015 मध्ये 8 आणि यावर्षी तर तीन दिवसांत 2 जणांनी प्राण गमावलाय. पण या घटना पाहता याला सर्वेसर्वा पर्यटकच जबाबदार असल्याचं दिसतंय. कुंड, धबधबा धोकादायक असल्याचे फलकही इथे आहेत. पण पर्यटक त्याकडे दुर्लक्षच करताना दिसतात. तळीराम आणि तरूण पर्यटकांचं तर विचारायलाच नको. अतिउत्साहात स्व:तचा घात करून घेतात. पोलिसांनी स्वखर्चानं फलक लावलेत. पोलीस बंदोबस्तही आहे. पण त्यांना जुमानतंय कोण.. अखेर या कुंडात आता पर्यटकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.


निसर्गाचा आनंद जरूर लुटा, वर्षा सहलीत धबधब्यांखाली मनसोक्त चिंब व्हा... पण जरा जपून जीवापेक्षा अनमोल काहीच नाही.